उंब्रज – दुधात भेसळ करणाऱ्या चार दूध संकलन केंद्रांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यामध्ये बारा जणांना ताब्यात घेण्यात आले. शनिवार (दि. १) रोजी दुपारपासून ही कारवाई सुरू होती. या कारवाईने मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने गुन्हा शाखेच्या पथकाने तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी नवीन कवठे, खराडे, हेळगाव व केंजळ याठिकाणी एकाच वेळी छापे टाकले.
या छाप्यांमध्ये दूध संकलन करणारे दूध पावडर,पॅराफिन, सोया ऑईल व इतर घटकांचा समावेश करून त्यापासून दूध बनवित असल्याचे आढळून आले. या बनवलेल्या दुधाची संकलन केलेल्या दुधात भेसळ करीत असल्याचे आढळून आले.
यावेळी स्थानिक गुन्हे विभागाच्या पथकाने दूध संकलनासाठी वापरण्यात आलेली सात वाहने ताब्यात घेतली आहेत. तसेच याप्रकरणी बारा जणांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत कारवाईची प्रक्रिया सुरू होती त्यामुळे अधिक तपशील मिळू शकला नाही.