पाईट (वार्ताहर) – शेतीला जोडधंदा म्हणून बळीराजा शेतकरी हा दुग्ध व्यवसायाकडे वळला. मात्र, आता हाच दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. संपूर्ण देशभरात करोना व्हायरसने थैमान घातल्याने तब्बल तिसऱ्यांदा लॉकडाऊन वाढवले आहे. याचा सर्वाधिक फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून दुधाचे खरेदी दर हे खासगी डेऱ्यांसोबतच सहकारी संस्थांनी उतरविल्याने “पाण्याच्या भावात दूध विकण्याची वेळ बळीराजावर आली असून उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याचे खेड तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
जनावरांना लागणाऱ्या खुराकाच्या वाढलेल्या किंमती आणि चाऱ्याचा विचार केला तर शेतकऱ्यांना गायीच्या एक लिटर दूध उत्पादनासाठी तब्बल 25 ते 30 रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र हेच दूध सध्या छोट्या डेअऱ्या 20 रुपये तर सहकारी संस्था कात्रज 26.80 तर अमूल 23.80 रुपये लिटर ने विकले जात असल्याने शेतकऱ्यांना लिटरमागे तब्बल 7 ते 10 रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे तर दुसरीकडे जनावरांना लागणारा खुराक ही लॉकडाऊनमुळे वेळेवरती मिळत नसून दरही वाढले असल्याने दुधामध्ये मोठ्या प्रमाणात घट येत असून शेतकऱ्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.
करोनामुळे दुध व्यावसावरती मोठा परिणाम झाला असून कामगारांची घटलेली संख्या, कोलमडलेली वाहतूक व्यवस्था, दूध प्लॅट चालवण्यासाठी साधन सामग्रीचा अपुरा पुरवठा व दूध पावडरचे घटलेले ग्राहक आणि करोनामुळे शहरात होणारा दुधाचा कमी पुरवठा यामुळे दुधाचे दर घसरल्याचे डेअरी चालकां चे म्हणणे आहे. सरकार ने आता यात लक्ष घावून दुध उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असणार आहे.
दूध संकलन दिवसाआड होण्याची भीती
खेड तालुक्यातून दूध संकलन केले जाते ते प्रामुख्याने पुणे व मुंबई शहरांत वितरित केले जाते; परंतु लॉकडाऊन स्थिती कायम असल्याने कात्रज दूध संघ रोज 2 लाख 20 हजार लिटर संकलन करते तर 75 हजार लिटर दूध कोल्हापूर दूध संघ व पराग दूध संघाला पावडर बनवण्यास दूध पुरवते तर 45 हजार लिटरचे इतर पदार्थ बनवले जातात तर 1 लाख लिटर दुधाची विक्री करते तर काही दिवसांपासून दूध विक्री फक्त 50 हजार लिटरवर आली असल्याने दूध संकलन सुद्धा दिवसाआड करण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उन्हाळी हंगामी पदार्थांच्या विक्रीत 90 टक्क्यांनी घट
उन्हाळ्यात दही, पनीर, ताक, आईस्क्रीम आदी दुधापासून बनणाऱ्या पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते यामुळे या दिवसात दुधाला बाजारभाव चांगला मिळतो; परंतु या वर्षी लॉकडाऊनमुळे या पदार्थांच्या विक्रीत जवळपास 85 ते 90 टक्के घट झाली असून दुधाचे दर आणखी कमी होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांचे खरीप हंगामासाठी असणारे नियोजन पूर्णपणे कोलमडले असून याचा खरीप हंगामातील पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार असल्याने बळीराजा चिंतेत आहे
संस्थाही डबघाईला
करोना व्हायरसमुळे औद्योगिक क्षेत्राप्रमाणेच दुधव्यवसायला घरघर लागली आहे. सहकारी संस्था तसेच खासगी दूध संस्था बंद पडल्या आहेत तर दुधाच्या विक्रीत विक्रमी घट झाली असल्याने संस्था डबघाईला आल्या असून किमतीतही मोठी घसरण झाली असल्याने दूध शेतकरी चिंतातूर झाले आहेत