सर्वच बाधितांना होते इतरही आजार
पुणे – शहरात गेल्या 24 तासांत आणखी सात जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ससून रुग्णालयात 5 तर भारती हॉस्पिटलमधील दोन रुग्णांचा समावेश आहे.
रविवारी दिवसभरात झालेल्या मृत्यूंमध्ये पाच महिला तर दोन पुरुषांचा समावेश आहे. त्यामध्ये घोरपडी गाव येथे राहणाऱ्या 60 वर्षीय महिलेला अत्यावस्थेत शनिवारी (दि.2) रात्री ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पहाटेच त्यांचा मृत्यू झाला. मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर येथे राहत असलेल्या 24 वर्षीय तरुणाचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याला टीबीचा त्रास होता. पर्वती येथील शिवदर्शन परिसरातील 59 वर्षीय महिला आणि गंजपेठेत राहणाऱ्या 69 वर्षीय महिलेवर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, या दोघांना अन्य आजार असल्यामुळे आणि करोनाची लागण झाल्यामुळे आज सकाळी मृत्यू झाला.
पद्मावती परिसरात राहणाऱ्या 65 वर्षीय व्यक्ती आणि लोहियानगर परिसरातील 50 वर्षीय महिलेला 3 मे रोजी ससून रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे 24 तासात दोघांचाही मृत्यू झाला. तर येरवडा परिसरातील 61 वर्षीय व्यक्तीवर 30 एप्रिलपासून करोनावर उपचार सुरू होते. त्यांचाही आज सायंकाळी मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, मृत व्यक्तीची अन्य आजाराचा इतिहास असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.