चिखली – राज्यात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने संपूर्ण राज्यात कडक लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील किराणा, दूध डेअरी, मेडिकल व वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश आहे. परंतु पिंपरी-चिंचवड शहरात छुप्या पद्धतीने दारूच्या बॉटलवरील एमआरपी, एक्सप्रायरी व बॅच नंबर खोडून अतिरिक्त दराने मद्याची विक्री केली जात आहे.
लॉकडाऊनमध्ये मद्यविक्री करण्यास बंदी आहे. परंतु वाइन शॉप, बिअर शॉपी तसेच इतर मद्यविक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी सध्या शहरात एमआरपी, एक्सपायरी तसेच बॅचनंबर खोडून चढ्या दराने मद्यविक्री करण्यास सुरुवात केली आहे. ही मद्यविक्री आहोरात्र छुप्या पद्धतीने व ऑनलाइन पैसे बॅंक खात्यात पाठवून केली जात आहे.
तसेच संबंधितांना पाहिजे त्या ठिकाणी किंवा विशिष्ट ठिकाणी माल घेण्यास या वेळेत या, अशा रंगाची व या नंबरची गाडी असेल असा संदेश दिला जातो. गाडी येऊन माल देऊन जाते परंतु आहोरात्र रस्त्यावर पोलीस बंदोबस्त असणाऱ्या पोलिसांना मात्र याचा तपास लागत नाही हे मात्र विशेष आहे.
नेल पॉलिस काढण्यासाठी वापरले जाणारे लिक्विड, बॉडी स्प्रे तसेच इतर लिक्विडचा वापर किंमत खोडण्यासाठी केला जात आहे. सध्या 180 एमएल क्वॉरटर लॉकडाऊनपूर्वी 150 रुपयाला मिळत होती. परंतु सध्या तिच क्वाटर 350 ते 400 रुपयांना विकत घ्यावी लागत आहे. बेकायदा पद्धतीने व अतिरिक्त किंमत घेऊन दारूविक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.