क्रिकेट कॉर्नर : नव्या फिक्‍सिंगचीच नांदी

– अमित डोंगरे

आयसीसीने झिम्बाब्वेचा माजी कर्णधार व जगभरात होत असलेल्या विविध टी-20 लीगमध्ये अनेक संघांचा प्रशिक्षक म्हणून काम केलेल्या हीथ स्ट्रीकवर आठ वर्षांची बंदी लावल्याने जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडणार आहे. ही नव्या फिक्‍सिंगचीच नांदी आहे का, असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

आपल्या कारकिर्दीत निष्कलंक असलेल्या स्ट्रीकने आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग केल्यामुळे त्याच्यावर आठ वर्षांची बंदी लावली गेली आहे. स्ट्रीकने आयपीएल स्पर्धेतही कोलकाता नाईट रायडर्स, गुजरात लायन्स या संघांचे प्रशिक्षकपद भूषवले होते. त्याच्यावर जे आरोप झाले आहेत त्याचा 2018 सालाशी खूप निकटचा संबंध असल्याचे बोलले जात आहे. म्हणजेच त्याच्या माध्यमातून बुकी व सट्टेबाजांनी आयपीएलमध्येही खेळ केल्याची शक्‍यता नाकारता येणार नाही.

त्यापूर्वी 2013 साली श्रीशांतने अन्य काही खेळाडूंसह असाच खेळ केल्याचे समोर आले होते. तेव्हा त्याच्यावर बंदीही लावली गेली होती. आता स्ट्रीकवरची बंदी कोणकोणत्या गोष्टींचा उलगडा करेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मुळातच 1999-2000 साली जगभरात जेव्हा मॅचफिक्‍सिंग उघड झाले तेव्हापासून क्रिकेटच्या प्रत्येक सामन्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनात बदल झाला. इतकेच कशाला मुंबई-कोलकाता आणि बेंगळुरू-हैदराबाद या सामन्यात जे घडले ते देखील फिक्‍सिंगच आहे की काय अशी विचारणा आता होऊ लागली आहे.

मुंबईविरुद्ध कोलकाताला, तर बेंगळुरूविरुद्ध हैदराबादला हातात असलेले सामने गमवावे लागले. आता हे सामने खरेच गमावले का मुद्दाम गमावले, असा प्रश्‍न उभा राहिला आहे. त्याच संशयात स्ट्रीकवरील बंदीने भर पडली आहे. स्ट्रीकने आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी नियमाचे उल्लंघन केल्यचा ठपका ठेवला गेला होता.

स्ट्रीकनेही हॅन्सी क्रोनिएप्रमाणे आपल्या पापाची कबुली दिली. त्यानंतरच त्याच्यावर बंदी लावली गेली. आता स्ट्रीकने जर तोंड उघडले तर मोठे मासेही गळाला लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. क्रोनिएने त्यावेळी जाहीर कबुली दिली होती. पण त्याच्याकडून काही गुपिते समजण्यापूर्वीच त्याचा विमान अपघातात मृत्यू झाला. यामुळे चौकशी आणि तपास तिथेच थांबला.

वेस्ट इंडिजमध्ये 2007 साली झालेल्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेदरम्यान पाकिस्तानचे तत्कालीन प्रशिक्षक बॉब वुल्मर यांचाही संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी वुल्मर त्यांनीच लिहिलेले एक पुस्तक प्रकाशित करणार होते. त्यात फिक्‍सिंगबाबतही काही माहिती उघड करणार होते.

या पुस्तकातून आपल्यावर बालंट येईल का, अशी भीती काही लोकांना वाटली असावी. त्यातूनच वुल्मर यांचा काटा काढला असावा, असा निष्कर्ष खुद्द या प्रकरणाचा तपास करत असलेल्या स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांनीही काढला होता. यावरूनच या प्रकारांची व्याप्ती किती मोठी आहे, हे कळून येते.

झिम्बाब्वेच्या महान क्रिकेटपटूंमध्ये गणला जात असलेल्या स्ट्रीकवर 2017 व 2018 साली झालेल्या अनेक सामन्यांबाबत संशय व्यक्‍त केला गेला आहे. केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच नव्हे, तर आयपीएल, बांगलादेश प्रीमिअर लीग, अफगाणिस्तान प्रीमियर लीगमधील अनेक सामन्यांचा यात समावेश आहे. त्याच काळात स्ट्रीक कोलकाता संघाचा प्रशिक्षकही होता.

त्यामुळे आता त्यावेळी झालेल्या व सध्या भारतात सुरू असलेल्या आयपीएलच्या सामन्यांबाबतही धक्‍कादायक गोष्टींचा खुलासा झाला तर पुन्हा एकदा अवघे क्रिकेटविश्‍व ढवळून निघेल, यात शंका नाही. याचाच अर्थ सध्या सुरू असलेल्या आयपीएलवरही हेच सावट निर्माण झाले आहे, असे म्हणायला हरकत नाही. सज्जनांचा हा खेळ काही दुर्जनांमुळे बदनाम होत आहे हे मात्र खरे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.