मुंबई : अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य, मुंबई येथील गुप्तवार्ता विभागास दिशाभूल करणारा मजकूर असलेली काही आयुर्वेदिक औषधे नागपूर वर्धा मार्गावरील एका पेढीत विक्रीस उपलब्ध असल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे नागपूरच्या औषध निरीक्षक पथकाने गुरूवारी हॉटेल रॉयल फूड, खडकी, जिल्हा, वर्धा या ठिकाणी भेट दिली. या ठिकाणी विविध प्रकारची आयुर्वेदिक औषधे विक्रीसाठी प्रदर्शित करण्यात आली होती.
इथे उपलब्ध असलेल्या औषधापैकी काही औषधे बादल पेन ऑईल, डायबेटिस केअर चूर्ण, पाचक मेथी (उत्पादक मे. मानस आयुर्वेदिक फार्मसी, गाझीयाबाद, उ. प्र. ) यावर दिशाभूल करणारा मजकूर तसेच या उत्पादनाबाबत दिशाभूल करणारा मजकूर असलेली जाहिरात प्रदर्शित केली असल्याचे आढळून आले.
अशा उत्पादनावर असलेला मजकूर औषधे जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन होत असल्याने 15,800/- रुपये किंमतीचा उपलब्ध औषध साठा जप्त करण्यात आला.