नागपूर – अमरावतीच्या खासदार नवनीत यांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्याच्या पत्नीसोबत अश्लील भाषेत संभाषण केले. याप्रकरणी राज्य महिला आयोगाने खासदार राणा यांना नोटीस बजावल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. दरम्यान, युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्याने पत्नी आणि 18 महिन्याच्या मुलीला वाऱ्यावर सोडून दुसऱ्या स्त्रीसोबत संसार सुरु केला. पीडित महिलेने तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता, खासदार राणा यांनी तिच्यासोबत अश्लील भाषेत संभाषण केले होते.
यासंदर्भात रुपाली चाकणकर म्हणाल्या, 17 जानेवारीला अमरावती जिल्ह्यातील एका पीडित महिलेची तक्रार राज्य महिला आयोगाला प्राप्त झाली. त्या तक्रारीची दखल घेत राज्य महिला आयोगाने संबंधित पोलिस ठाण्याला कारवाई करण्याचे निर्देश दिले. पतीने आपल्याला अंधारात ठेवून दुसरा विवाह केला आणि पीडितेसह तिच्या 18 महिन्यांच्या मुलीला वाऱ्यावर सोडले. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेचा पती हा खासदार राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा पदाधिकारी आहे आणि खासदार राणा यांनी पिडीत महिलेची तक्रार ऐकून न घेता, दाखलही न होऊ देता आरोपीला पाठीशी घालण्याचे काम केले.
पीडित महिलेने राणा यांना फोन केला असता, तिचा नंबर त्यांनी ब्लॉक केला. त्यानंतर दुसऱ्या नंबरवरून फोन केल्यानंतर खासदार राणा यांनी अत्यंत अश्लील भाषेत पीडित महिलेशी संवाद साधला. खासदार राणा यांनी आपल्यासोबत जे संभाषण केले, ते अतिशय अश्लील भाषेत केले आणि ते मानहानी करणारे होते अशी तक्रार करत पीडित महिलेने खासदार राणा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राज्य महिला आयोगाकडे केली आहे. त्याची दखल घेत त्याच दिवशी म्हणजे 17 जानेवारीलाच राज्य महिला आयोगाने खासदार राणा यांना नोटिस बजावली असून संबंधित घटनेचा खुलासा मागितला असल्याचे रुपाली चाकणकर म्हणाल्या. दरम्यान नवनीत राणा महिला आयोगाच्या नोटीसला काय उत्तर देतात आणि हे प्रकरण काय वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.