पुणे – प्रतिजैविक (अॅन्टी बायोटिक्स)औषधे लिहून देताना त्याचे किती डोस, किती दिवस घ्यावेत, याच्या सूचना लिहिणे बंधनकारक असल्याचे आदेश वजा पत्र आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने वैद्यकीय महाविद्यालयातील आणि खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना दिले आहेत.
काही रोगांमध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रतिजैविकांचा वापर हा पर्याय आहे. यामुळे या गोष्टींच्या वापराबाबत सध्याच्या डॉक्टरांना आणि त्यापुढील पिढीला याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. डॉक्टरांशिवाय फार्मासिस्टना देखील प्रतिजैविकांच्या वापराबाबत सावध केले आहे. तसेच प्रिस्क्रिप्शन नसेल, तर प्रतिजैविकांची विक्री करू नये, असे आदेश दिले आहेत. बहुतेक डॉक्टरांनी या निर्णयाला अनुकूलता दर्शवली आहे, तर काहींनी सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये गर्दी लक्षात घेता त्याच्या व्यावहारिक अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
“रोगनिदान चाचणीचे निकाल येईपर्यंत प्रतिजैविक लिहून द्यावी लागतात. कारण, रुग्णाला प्रतीक्षा करायला लावणे हे त्याच्या प्रकृतीच्या दृष्टीने शक्य नसते. देशातील जवळपास ८० टक्के आरोग्यसेवा खासगी प्रॅक्टिशनर्सद्वारे केली जाते. तीनपैकी एक डॉक्टर अशी प्रतिजैविक औषध लिहून देतात.” – डॉ. रवींद्र कुटे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र
“हे खरोखर एक चांगले पाऊल आहे. अँटीबायोटिक्स लिहून देणार्या नॉन-अलोपॅथिक डॉक्टरांवर कोणतीही देखरेख नाही. त्याशिवाय फार्मासिस्ट प्रिस्क्रिप्शनशिवाय अँटीबायोटिक्स ओव्हर द काउंटर विकत आहेत, जे देखील अनियंत्रित आहे.” – डॉ. एच. के. सेल, कार्यकारी संचालक, नोबल हॉस्पिटल
“अन्न व औषधी प्रशासन केमिस्टवर सतत लक्ष ठेवून आहे. केमिस्टकडे औषध विक्रीची नोंद केली जाते. प्रिस्क्रिप्शननुसारच औषधे विकावीत, यासाठी आम्ही आमच्या सदस्यांना प्रशिक्षण देतो.” – प्रसाद दानवे, सहसचिव, महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो.