पुणे, दि. 1 -देखभाल दुरुस्ती आणि विकासकामांच्या नावाखाली दहा लाखांपर्यंतची कामे करून महापालिकेची तिजोरीची “साफसफाई’ करण्याला आता लगाम बसणार आहे. दक्षता विभागाकडून आता 10 लाखांवरील कामांचीही तपासणी केली जाणार आहे. यापूर्वी केवळ 25 लाखांवरील कामांच्या निविदांची आणि मान्यतांची तपासणी दक्षता विभाग करत होता. त्यामुळे वर्षभरात 25 ते 10 लाखांदरम्यान होणाऱ्या 500 ते 600 कोटींच्या कामात अनागोंदी व्हायची. त्यालाही आता लगाम बसणार आहे.
विकासकामे लवकर मार्गी लागावीत, निकृष्ट कामांना आळा बसून गैरप्रकार थांबले जावेत यासाठी अतिरिक्त आयुक्तांकडील निविदांचे अधिकार विभागप्रमुख, कार्यकारी अभियंता, उप अभियंता यांना देण्यात आले आहेत. तर, त्याच वेळी परिमंडळ उपायुक्त आणि सहायक आयुक्तांच्या आर्थिक अधिकारातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे निविदांची मंजुरी वेगाने होणार आहे. या कामांमधील गैरव्यवहार व चुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी या कामांच्या निविदांची तपासणी दक्षता कडून घेतली जाणार आहे.
कोट्यवधींचे गैरप्रकार थांबण्याचा दावा
नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतून 20 लाखांपर्यंतची कामे केली जातात. त्यात प्रामुख्याने पदपथ दुरुस्ती, ड्रेनेज साहित्य खरेदी, फूटपाथ दुरुस्ती, कॉंक्रीटीकरण, स्वच्छतागृह दुरुस्ती, रंगरंगोटी, चेंबरची स्वच्छता, बाकडे बसविणे, भिंती रंगविणे, समाज मंदीराची देखभाल दुरूस्ती अशा शेकडो कामांचा समावेश आहे. क्षेत्रीय कार्यालय आणि परिमंडळ स्तरावर या निविदा काढून अतिरिक्त आयुक्तांची मान्यता घेऊन ही कामे केली जातात, ही सर्व 25 लाख ते 10 लाखांदरम्यान असतात. त्यामुळे दक्षता विभाग ही कामे आतापर्यंत तपासत नव्हता. त्यामुळे त्यात अनेकदा काम करता बिल देणे, कामच न करणे, एकीकडे मान्यता आणि दुसरीकडे काम करणे, निविदेआधीच कामे करणे असे प्रकार व्हायचे. मात्र, आता ही कामे दक्षता विभागाच्या अख्त्यारित आली आहेत.