नगर – भाजपच्या जम्बो प्रदेश कार्यकारिणीच्या घोषणेनंतर आता तीन जिल्हाध्यक्षांची नेमणूक होण्याचे वेध स्थानिक कार्यकर्त्यांना लागले आहेत. त्या दृष्टीने पक्षाच्या वरिष्ठपातळीवरून पात्र उमेदवारांचा शोध सुरू करण्यात आला आहे. तर दुसरीकडे इच्छुकांकडून मोर्चोबांधणी सुरू झाली असून आपण या पदासाठी कसे योग्य हे श्रेष्ठींपर्यत पोहचिण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
दरम्यान, पक्षाची वाढलेली कामे आणि त्यांचा कॉर्पोरेट पद्धतीने वरून होत असलेला पाठपुरावा, त्याला द्यावी लागणारी आर्थिक जोड लक्षात घेऊन जे खऱ्या अर्थाने या जिल्हाध्यक्षपदासाठी पात्र आहे, ते मात्र ही जबाबदारी स्वीकारायला फारसे कोणी तयार नसल्याचे सांगण्यात येते आहे. ज्यांनी ही जबाबदारी उत्साहाने स्वीकारली असती, वेळ आणि पैसाही दिला असता त्या प्रमुख इच्छुकांची प्रदेश कार्यकारिणीत वर्णी लावली गेल्यामुळे आता नवे चेहरे समोर आणण्याशिवाय पर्याय राहिलेला दिसत नाही.
शहर जिल्हाध्यक्षपदासाठी विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांचे नाव आघाडीवर असून त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचेही मत महत्वाचे ठरणार आहे. कारण आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मंत्री विखे आपल्या मर्जीतील उमेदवाराला संधी देऊ शकतील. सध्या तरी या पदासाठी सचिन पारखी, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, वसंत लोढा, माजी नगरसेवक धनजंय जाधव हे इच्छुक आहेत.
दक्षिण जिल्हाध्यक्षपदासाठी युवराज पोटे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्या नावाला वरिष्ठपातळीवरून देखील अनकुलता आहे. पण ओबीसी चेहरा देण्याचा मानस पक्षाचा आहे. त्यामुळे ही संधी पुन्हा शेवगाव किंवा पाथर्डीला मिळण्याची शक्यता आहे. त्याबरोबर श्रीगोंद्यातून यापदासाठी इच्छुक वाढले आहेत. दरम्यान, आमदार प्रा. राम शिंदे यांनी ही संधी कर्जतला देण्यात यावी या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. उत्तर जिल्हाध्यक्षपदासाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे नाव येत असले तरी या ठिकाणी मंत्री विखे जे नाव सुचवतील ते अंतिम होणार आहे.
दि. 11 व 12 ला माधव भंडारी नगरमध्ये नवीन जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांची मते व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी दि. 11 व 12 मे रोजी भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी नगरमध्ये येणार आहेत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी केलेल्या चर्चेनंतर त्याचा अहवाल तयार करून ते भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सादर करणार आहेत.