कराड – म्हासोली (ता. कराड) येथील 35 वर्षीय युवकाला करोनाची बाधा झाली आहे. या नवीन रुग्णामुळे कराड तालुक्यातील करोनाबाधितांचा आकडा 91 वर पोहचला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांत तालुक्यात करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले नव्हते. उलट करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने तालुक्यातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत होते. मात्र, शनिवारी पुन्हा एक रूग्ण सापडल्याने चिंतेत आणखी वाढ झाली.
यापूर्वी कराड दक्षिणेत म्हारूगडेवाडी येथे दोन करोनाबाधित रूग्ण सापडले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला. एक करोनामुक्त झाल्याने कराड दक्षिण विभागाने नि:श्वास सोडला होता. मात्र, शनिवारी पुन्हा विभागातील म्हासोली गावात एक रुग्ण आढळल्याने उंडाळे विभागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हासोली येथील हा 35 वर्षीय युवक पुणे- आळंदी येथे नोकरीनिमित्त स्थायिक झाला होता. मात्र, लॉकडाऊनमुळे तो दि. 24 मार्च रोजी आपल्या गावी आला होता. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत तो शेतातील सर्व कामे करत होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपूर्वी त्याला अचानक ताप आल्याने त्याने खासगी दवाखान्यात उपचार घेतले.