सोनम परब
लॉकडाऊननंतरच्या काळात ओटीटीची लोकप्रियता प्रचंड वाढत गेली. बॉलीवूडमधील अनेक कलावंतांनी या आधुनिक व्यासपीठाकडे आपला मोर्चा वळवला. वेबसीरिजना उधाण आले. रसिकांनीही चांगलाच डोक्यावर घेतला. असे असले तरी ओटीटी प्लॅटफॉर्मसवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रम, मालिका यांमध्ये आक्षेपार्ह आणि अश्लील भाषा वापरल्याचा आरोप सातत्याने होत आहे.
सध्या ओटीटीवर दबदबा असणारे नेटफ्लिक्स वादात अडकले आहे. नेटफ्लिक्सवरील “ए सुटेबल बॉय’ या वेबमालिकेतील एका दृष्यावरून मोठा वाद आणि चर्चा होत आहे. त्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
मीरा नायर दिग्दर्शित “अ सुटेबल बॉय’ ही मालिका गेल्या महिन्यात नेटफ्लिक्सवर प्रसारित झाली. सहा भागांची ही मालिका यापूर्वी बीबीसी वन या वाहिनीवर प्रसारित झाली आहे. नेटफ्लिक्सने हिंदी भाषेत अनुवादित करून प्रदर्शित केली आहे. त्या मालिकेतील एका वादग्रस्त प्रसंगावरून टीकेची राळ उठली आहे. नेटफ्लिक्सचा निषेध करण्याचे आवाहन केले जाते आहे. “बॉयकॉट नेटफ्लिक्स’ हा हॅशटॅग ट्विटरवरून ट्रेंड सुरू झाला आहे. नेटफ्लिक्सच्या बाजूने आणि विरोधात मते मांडली जाऊ लागली आहेत आणि ट्विटचा पाऊस पडू लागला आहे.
काही लोकांच्या मते अगदी किरकोळ मुद्द्याला विनाकारण महत्त्व दिले जाते आहे, तर काही लोकांच्या मते हिंदूसाठी ही अपमानास्पद बाब आहे आणि नेटफ्लिक्सने माफी मागणे गरजेचे आहे. अर्थात, काही लोक या वादाच्या विरोधातच आहेत. त्यांच्या मते पाहणाऱ्या लोकांनी ठरवावे की त्यांनी काय पाहायचे आणि काय पाहायचे नाही. त्याचबरोबर निर्मात्यांनीही विनाकारण कोणतीही धार्मिक स्थळे किंवा प्रतीके दाखवू नयेत.
नेटफ्लिक्सच्या जुन्या मालिकांवरही आरोप होऊ लागले आहेत. सैफअली खान, नवाजुद्दीन सिद्धीकी आणि पंकज त्रिपाठी सारख्या अभिनेत्यांची “सिक्रेड गेम्स’ ही मालिका आणि राधिका आपटे हिची “घूल’ मालिकेवरही आरोप होत आहेत.
यासंदर्भातील विविध मतप्रवाह विचारात घेतल्यास प्रत्येकाची आपापली बाजू आहे. अनेकदा वेबमालिका किंवा चित्रपटनिर्माते जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या वादग्रस्त गोष्टी चित्रीकरणात ठेवत असतात. कारण त्यानिमित्ताने का होईना पण चर्चा होते, त्यातून प्रसिद्धी मिळते. कित्येकदा तर अशा मालिका वा चित्रपटांच्या कथानकामध्ये जराही दम नसतो; पण वादग्रस्त मुद्द्यांमुळे त्यांची अफाट चर्चा होते आणि प्रेक्षक ती पाहण्यासाठी आटापिटा करतात. साहजिकच यामुळे निर्मात्याचे ईप्सित साध्य होऊन जाते.