विज्ञानविश्‍व : सुरक्षित सोशल मीडियासाठी एआय

मेघश्री दळवी

आपण अनेक वेगवेगळ्या सोशल मीडियाचा वापर करत असतो. कधी एकमेकांना मेसेज करण्यासाठी, तर कधी काही अनुभव सर्वांशी शेअर करण्यासाठी. त्यात काही वेळा अनोळखी व्यक्‍तीचा मेसेज येतो, फ्रेंडरिक्‍वेस्ट येते, तर केव्हा तरी एखादी अनोळखी लिंक येते. बहुतेक वेळा आपण नीट विचार करून अशा गोष्टींना उत्तर देण्याचं टाळतो किंवा ब्लॉक करून टाकतो. पण तरीही सोशल मीडियातल्या काही जाळ्यांमध्ये अडकणाऱ्या माणसांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. यावर उपाय असले तरी सर्वांना ते ठाऊक असतीलच असं नाही. विशेषत: मुलांना याचा धोका खूप आहे. म्हणून आता सोशल मीडियाला सर्व दृष्टींनी सुरक्षित करण्यासाठी एआय वापरायची कल्पना पुढे येते आहे.

एआय म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. माहितीचं तर्कशुद्ध विश्‍लेषण करत त्यातून योग्य तो अर्थ लावत, योग्य तो निष्कर्ष काढू शकणारी प्रणाली. आज अनेक ठिकाणी अचूक विश्‍लेषण करणाऱ्या कार्यक्षम एआय प्रणाल्या वापरल्या जातात. बहुतांशी एआय प्रणाल्या ह्या ठराविक कामासाठी बनवलेल्या असतात आणि त्यांना पुरवलेल्या डेटावरून त्या शिकत असतात. एकदा शिकल्यानंतर एआय प्रणाल्या त्यावरून नव्या डेटाचं विश्‍लेषण करतात, आणि त्यात काही वेगळं,खटकणारं आढळलं तर त्या आपल्याला सतर्क करू शकतात.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या चर्चा आणि माहितीच्या देवाणघेवाणीवर एआय प्रणालींची नजर असते. त्यातून समाजाचा कल, आवड, भावना, यांचा अंदाज घेऊन त्याचा मार्केटिंगसाठी वापर केला जातो. हेच विश्‍लेषण वापरून सोशल मीडियावरील सुरक्षिततेसाठी एआयचा उत्तम उपयोग होऊ शकतो.

बॅंकांसारख्या वित्तीय संस्थांमध्ये फ्रॉड शोधण्यासाठी एआय प्रणालींचा वापर होतो. तिथे ग्राहकाच्या एकूण आर्थिक व्यवहारावरून या प्रणाली त्याचा सर्वसाधारण पॅटर्न निश्‍चित करतात. मग त्यात अचानक जास्त पैसे आलेले किंवा गेलेले दिसल्यास ग्राहक आणि वित्तसंस्था, दोघांनाही सूचना मिळतात. त्याच धर्तीवर एखाद्या व्यक्‍तीच्या सोशल मीडियावरील पॅटर्न एआय प्रणाली समजून घेईल आणि मग त्यात काही अनियमितपणा आढळल्यास सतर्क करील. उदाहरणार्थ,

एखाद्या व्यक्‍तीच्या अकाउंटवर अचानक आक्षेपार्ह मजकूर किंवा छायाचित्र आल्यास ही पहारा देणारी प्रणाली त्या व्यक्‍तीला लगेचच माहिती देऊ शकेल. काही वेळा अकाउंटक्‍लोन केलं जातं, तिथे मूळ व्यक्‍तीला तात्काळ धोक्‍याचा इशारा देईल. काही अकाउंटवरून सतत फिशिंगमेसेज जात असेल, तर त्यासंबंधी माहिती त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे जाईल.

सोबत काही ग्रुप्समध्ये किंवा वैयक्‍तिक अकाउंटवर त्रासदायक, धोकादायक, बेकायदेशीर गोष्टी होताना दिसल्या तर त्याकडे लक्ष वेधण्याचं काम अशा प्रणाली करू शकतात. ज्या प्रमाणात आपल्या सर्वांचा सोशल मीडिया वावर वाढत जाणार आहे, त्याच प्रमाणात सोशल मीडिया सुरक्षिततेत एआयचा सहभाग वाढत जाणार आहे हे निश्‍चित.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.