अमृतकण : वेटिंग रूम

अरुण गोखले

जीवन प्रवासातले छोटे छोटे अनुभव आपल्याला काही गोष्टी किती सहजतेने सांगून, शिकवून जातात त्याचा हा अनुभव. अशाच एका रेल्वे प्रवासात आम्हास नाईलाजाने एका स्टेशनच्या वेटींग रूममध्ये थांबण्याची वेळ आली होती. आम्ही सर्वजण त्या वेटिंग रूममध्ये राहिलो. खाल्लो, प्यायलो, गप्पा गोष्टी मारल्या आणि जेव्हा आमची पुढची गाडी आली तेव्हा प्रत्येक जण आपापले सामान घेऊन त्या वेटींग रूममधून बाहेर पडले. त्यावेळी बाहेर निघताना सद्‌गुरू म्हणाले, “संसार प्रपंच हीसुद्धा एक वेटींग रूम आहे.’

त्यावेळच्या घाईगडबडीत त्यांच्या या बोलण्याचा नेमका अर्थबोध झाला नाही. पण पुढच्याच एका सत्संगात कोणा आर्त मुमूक्षू उपासकांनी तोच प्रश्‍न त्यांना विचारला. “महाराज! त्या दिवशी आपली गाडी आली म्हणून आपण सारे आवरून वेटींग रूममधून बाहेर पडताना तुम्ही म्हणाला होतात की, संसार प्रपंच हीसुद्धा एक वेटिंग रूम आहे. त्याचा अर्थ काय?’

त्यावर हसत ते म्हणाले. “बाबांनो! त्याचं काय आहे आपलं जीवन हा एक प्रवास आहे. या प्रवासातलं माणसाचं घर, संसार, प्रपंच आणि त्याचं तिथलं वास्तव्य हे तर त्या वेटिंग रूममध्ये राहण्यासारखं असायला हवं. म्हणजे वेळ आली, गाडी आली की त्या रूममधून बाहेर जाताना त्रास होत नाही. आता आपलंच बघा ना, आपण त्या वेटींग रूममध्ये राहिलो. तिथल्या सुख सोयींचा उपभोग घेतला. तिथे सर्वांबरोबर खाल्लो, प्यायलो, मौज मज्जा केली. कोणी तर मस्त झोपही काढली होय ना. पण जेव्हा आपली गाडी आली तेव्हा आपल्याच इतर सोबत्यांना मागे ठेवून त्यांना अच्छा, बाय बाय म्हणून हसत, हात हालवीत त्यांचा निरोप घेतला आणि किती सहजतेने आपण तिथून बाहेर पडलो.

अगदी तसेच आपली वेळ आली, गाडी आली की आपल्याला भरलेल्या रमलेल्या सुखानंदाचे क्षण अनुभवलेल्या संसार रूपी वेटींग रूममधून तेवढ्याच अलिप्ततेने बाहर पडता आले पाहिजे. अर्थात हे सांगायला सोपे असले तरी अचारणात आणायला सोपे नाही हे तितकेच खरे. पण प्रामाणिक प्रयत्न केले, तसा अभ्यास केला तर मात्र जाणारा आनंदाने जातो. तुकोबांच्यासारखा. जाताना त्याच्या डोळ्यात पाणी नसते तर चेहऱ्यावर कर्तव्यपूर्तीच हसू असते. डोळ्यात पाणी असतं ते इतरांच्या त्याच्या वियोगाचं.’

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.