– मेघश्री दळवी
मिक्स्ड रिआलिटी हे क्षेत्र अलीकडे अनेक कारणांनी प्रकाशझोतात आहे. मनोरंजन उद्योगात, विशेषत: गेमिंगमध्ये मिक्स्ड रिआलिटीने आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. वास्तवात आभासी भर घालणाऱ्या या तंत्रज्ञानात आपण आता त्यातल्या आभासी गोष्टी हाताळूदेखील शकतो.
उद्योगधंद्यामध्ये मिक्स्ड रिआलिटीचा वापर अनेक प्रकारे करता येतो. साधं आपलं परिचयाचं किरकोळ खरेदीचं, म्हणजे रिटेल उद्योगाचं उदाहरण घेऊ. किराणा सामान अलीकडे आपण ऑनलाइन मागवू शकतो. पण कपडे खरेदी करताना कापडाचा पोत किंवा फिटिंग यासाठी आपल्याला प्रत्यक्ष जाऊन ट्रायल घेऊन पाहणे सोयीस्कर वाटतं.
आज मात्र आपल्या फिरण्यावर बंधन आहे आणि कपड्यांची ट्रायल घेण्यालाही बंदी आहे. अशा वेळी मिक्स्ड रिआलिटी तंत्रज्ञान वापरून व्हर्च्युअल ट्रायल घेता येते आणि निश्चिंतपणे खरेदी करता येते. विमान उड्डाण, अवकाश यानांची जोडणी, यासारख्या उद्योगात सतत चाचण्या घेणं शक्य नसतं. तसंच वैमानिकांना किंवा अवकाशवीरांना खऱ्याखुऱ्या परिस्थितीत प्रशिक्षण देणंदेखील कठीण आणि धोक्याचं असतं.
त्यामुळे तिथे सिम्युलेशन तंत्र अनेक वर्षे वापरात आहे. हल्ली मिक्स्ड रिआलिटीच्या मदतीने सिम्युलेशन अगदी शंभर टक्के खरं वाटेल अशा पातळीवर पोहोचलं आहे. त्यातली गुंतागुंतीची यंत्रणा वास्तवात जशी हाताळता येते तशीच आभासी प्रकारे हाताळता येत असल्याने प्रशिक्षणाचा दर्जाही उंचावला आहे.
मिक्स्ड रिआलिटीमध्ये आपण वास्तव आणि आभासी अशा दोन्हींचा संमिश्र अनुभव घेऊ शकतो. याचा खूप चांगला उपयोग वाहन उद्योगात होतो. वोल्क्सवॅगन ही या उद्योगातली एक अग्रगण्य कंपनी. तिने गाड्यांच्या उत्पादनात हे तंत्रज्ञान उत्तमरीत्या वापरलं आहे. गाडीच्या चासीच्या घडणीत सुमारे शंभर ठिकाणी स्पॉट वेल्डिंग करतात.
त्यामुळे चासीच्या तपासणीत यात कुठे कुठे दोष असतील हे पाहणं वेळखाऊ असतं. इथे मिक्स्ड रिआलिटी वापरून प्रत्यक्ष चासीवरच तिच्या आराखड्याची व्हर्च्युअल प्रतिकृती मांडतात. आराखड्याशी तुलना केल्यावर ज्या स्पॉट वेल्डिंगबाबत तपासणीची गरज दिसते, त्या ठिकाणी खुणा उमटतात.
त्यामुळे तपासणीचा वेळ झटक्यात खाली येतो आणि उत्पादनाची कार्यक्षमता वाढते. दुरुस्तीसाठी, देखभालीसाठी किंवा अधिक माहिती घेण्यासाठी गाड्यांची खास मॅन्युअल्स असतात. प्रत्यक्ष काम करताना ही मॅन्युअल्स वापरायची असतील तर खूपच किचकट होतं.
अलीकडे मात्र एक मोबाइल ऍप आणि मिक्स्ड रिआलिटी यांच्या संगमाने गाडीच्या भागाच्या जवळच या मॅन्युअलचा भाग दाखवायची सोय झालेली आहे. काही वेळा केवळ हात हवेत हलवून योग्य ती माहिती योग्य तितकी झूम करून पाहता येणंही त्यात शक्य आहे.
त्यामुळे काम सुकर होतं आणि एखादा नवखा माणूसही पटकन दुरूस्ती करू शकतो. गुगल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या मातब्बर कंपन्या आता या क्षेत्रात वेगाने जम बसवत आहेत. तेव्हा उद्या आपल्याला आपल्या घरातही मिक्स्ड रिआलिटीचा अनुभव मिळू शकतो!