– डॉ. मेघश्री दळवी
मध्यंतरी मंगळावरच्या विवराचा एक फोटो सोशल मीडियावर फिरत होता. युरोपियन आणि रशियन स्पेस एजन्सीच्या संयुक्त मोहिमेतल्या एक्झोमार्स ऑर्बिटरने हा फोटो टिपला होता. त्यातलं विवर इतकं हुबेहूब झाडाच्या बुंध्यासारखं दिसत होतं, की भल्याभल्यांनाही ते फसवून गेलं. मंगळ आपला शेजारी ग्रह, त्यामुळे तिथे सजीवसृष्टी आहे का, हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. तेव्हा असे फोटो आले की लगेचच तर्कवितर्कांना उधाण येतं. ते झाड असेल का? बुंधा कापल्यासारखा दिसतो आहे, तर तो कोणी कापला असेल?
हा कल्पनाविलास छान आहे. पण इथे साधा विचार केला तर लक्षात येईल की, हा फोटो मंगळाभोवती फिरत असताना उंचावरून घेतला आहे. एखादं झाड मंगळावर खरोखरीच असेल, तर त्याचा आकार केवढा असेल? उंचावरून त्याचा बुंधा इतका सुस्पष्ट दिसू शकेल का? असं एकच झाड तिथे कसं असू शकेल? बरं, वनराई असतील, तर त्या आधी का नाही दिसल्या? किंवा आपले पाच रोव्हर्स मंगळावर गेले, त्यांना कधी कोणतंही झाड का नाही दिसलं?
अनेकदा हा आपला दृष्टीभ्रम असतो. जे समोर दिसतं, त्याची आपल्या अनुभवाशी आपण सांगड घालत असतो. काही वेळा छायाप्रकाशाच्या खेळामुळेही असे भास होऊ शकतात. व्हायकिंग एकने 1976 मध्ये असाच एक फोटो आणला होता. त्यात मंगळाच्या पृष्ठभागावर चक्क एक मानवी चेहरा दिसत होता. झालं, सगळीकडे एकच विषय सुरू झाला. कदाचित मंगळावर सजीव असतील, आणि ते आपल्यासारखेच दिसत असतील हा एक अंदाज होता. तर तिथल्या सजीवांनी असं शिल्प साकारून मानवाला मानवंदना दिली असेल अशी कल्पनाही काही जणांनी लढवली. पण पुढच्या वेळी त्याच भागाचे मिळालेले फोटो वेगळे होते. त्यामुळे ही नाट्यमय चर्चा मागे पडली.
असा चकवा अनेक फोटोंनी दिलेला आहे. मागच्या वर्षीच्या नासाच्या मंगळाच्या एका फोटोत काही जणांना मशरूम्स दिसले होते. पण पृथ्वीवरच्या अळंब्यांसारखं काही दिसलं, तर ते अळंब्याच असतील असं नाही. प्रत्येक ग्रहावरच्या वातावरण, गुरुत्वाकर्षण अशा अनेक गोष्टींशी मेळ घालत तिथे जीवन विकसित होत असतं, परिस्थितीशी जुळवून घेत उत्क्रांत होत असतं, हे लक्षात घ्यायला हवं.
वैज्ञानिक मात्र कधी एका निरीक्षणावरून निष्कर्ष काढत नाहीत.
अनेक निरीक्षणं घेऊन, त्यांचं व्यवस्थित विश्लेषण करून, त्याला इतर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पुरावे देऊन ते आपला निष्कर्ष जाहीर करतात. या फोटोबाबत त्यांचा अदमास आहे, की एखाद्या प्रचंड मोठ्या खड्ड्याच्या आतील बाजूला बर्फ जमा झालं असेल आणि त्यामुळे या विशिष्ट रेषा फोटोत दिसत असतील. याच विवराच्या इतर फोटोंवरून हा आडाखा पटतो.पण अजूनही नवनवे फोटो चकवतात. मंगळावर कोणी सजीव असेल ही आपली आशा कदाचित अशा रोमांचक तर्कांमागे असेल.