पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा 20 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. यादृष्टीने परीक्षा परिषदेने तयारी सुरू केली आहे.
राज्यात सर्व परीक्षा केंद्रावर एकाच वेळी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांनी परीक्षा केंद्र निश्चितीचे कामकाज पूर्ण केले आहे. या परीक्षेसाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी , शिक्षण निरीक्षक हे जिल्हा समन्वयक म्हणून तसेच गटशिक्षणाधिकारी, वॉर्ड ऑफिसर हे तालुका समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. परीक्षा केंद्र संचालक, उपकेंद्रसंचालक, पर्यवेक्षक व शिपाई नियुक्ती तसेच परीरक्षण ठिकाण निश्चितीबाबत सूचनाही निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
परीक्षेचे गोपनीय साहित्य जिल्हास्तरावर 13 जुलैपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षा परीषदेच्या वतीने देण्यात आली आहे.