लखनौ – उत्तर प्रदेशातील सोहेलदेव भारतीय समाज पार्टीचे प्रमुख ओम प्रकाश राजभर यांनी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये आपला पक्ष सामील होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सरकारमध्ये सामील होण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेटायला आपण दिल्लीला गेलो नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राजभर यांनी शनिवारी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा व्हायला लागली होती. त्या पार्श्वभुमीवर त्यांनी हे स्पष्टिकरण दिले आहे.
“एसएचएसपी’ ने उत्तर प्रदेशातील 2017 च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपबरोबर आघाडी केली होती. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राजभर यांनी योगी सरकारमधून मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता आणि भाजपबरोबरचे सर्व संबंध तोडून टाकले होते.
विधौनसभा निवडणुकीत राजभर यांच्या पक्षाने समाजवादी पार्टीबरोबर आघाडी केली होती. मात्र निवडणुकीत समाजवादी पार्टीचा पराभव झाल्यामुळे “एसएचएसपी’ पुन्हा भाजपबरोबर आघाडी करणार असल्याची चर्चा व्हायला लागली होती. अमित शहा आणि राजभर यांच्या एकत्र फोटोमुळे जी चर्चा व्हायला लागली आहे, ती निराधार आहे, असे पक्षाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. हा फोटो जूना असल्याचे त्यांनी म्हटले आहे.