पुणे – देशातील पहिल्या महिला शिक्षिका आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी केली आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पुण्यात गुडलक चौकातील कलाकार कट्टा येथे मानकर यांच्या नेतृत्वाखाली स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
दरम्यान, या मोहिमेचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले जाणार असून त्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनाही निवेदन देणार आहे. ही मागणी मान्य होईपर्यंत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे मानकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
पक्षाचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, महिला अध्यक्षा प्रिया गदादे, युवती अध्यक्षा पुजा झोळे, युवक अध्यक्ष समीर चांदेरे, विद्यार्थी अध्यक्ष शुभम माताळे, अल्पसंख्याक अध्यक्ष समीर शेख, दिव्यांग अध्यक्ष पंकज साठे यांच्यासह कोथरूड विधानसभा अध्यक्ष हर्षवर्धन मानकर आणि पक्षाचे इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.