पुणे (व्यंकटेश भोळा) –सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रा. डॉ. शांतिश्री पंडित यांची दिल्लीतील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कुलगुरूपदी नियुक्ती झाल्याने पुणे विद्यापीठाच्या नावलौकिकात आणखी भर पडली आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत पुणे विद्यापीठातील जवळपास 15 प्राध्यापक अन्य विद्यापीठांत कुलगुरूपदी नियुक्त झाले आहेत. त्यामुळे “कुलगुरूंचे गुरूकूल’ अशी पुणे विद्यापीठाचे नव्याने ओळख होत असल्याचे अधोरेखित होत आहे.
देशातील प्रतिष्ठित विद्यापीठ म्हणून परिचित असलेल्या “जेएनयू’च्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून डॉ. पंडित यांची निवड झाल्याने पुणे विद्यापीठाच्या मान उंचावला आहे. पुणे विद्यापीठातील प्रा. एन. जे. पवार, डॉ. एम. जी. ताकवले, डॉ. डी. एन. धनागरे यांची शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या कुलगुरूपदी निवड झाली आहे. प्रा. पंडित विद्यासागर हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ-नांदेडचे कुलगुरूपद राहिले आहेत. प्रा. आर. एस. माळी, डॉ. एस.एफ. पाटील हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ-जळगावचे कुलगुरू राहिले आहेत. मराठी विभागातील व ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्राध्यापक बी. ए. चोपडे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ-औरंगाबादचे कुलगुरू म्हणून निवड झाली होती. विधी विभागातील प्राध्यापक दिलीप उके यांची महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली आहे. प्रा. राम ताकवले यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू म्हणून कार्यकीर्द भूषविली. डॉ. डी. एन. देवबागकर यांची गोवा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाली होती. विद्यापीठाच्या विधी विभागातील टी. एस. एन. शास्त्री यांची तामिळनाडूतील डॉ. आंबेडकर लॉ विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली आहे.
डॉ. उत्तम भोईटे यांची यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली होती. या उज्ज्वल परंपरेत आता प्रा. डॉ. शांतिश्री पंडित यांच्यामुळे आणखी मौलिक भर पडली आहे.
विद्यापीठातील प्राध्यापकच झाले कुलगुरू
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातच कार्यरत असताना अनेक प्राध्यापकांनी पुणे विद्यापीठात कुलगुरू म्हणून कार्यकीर्द भूषविली आहे. यात डॉ. राम ताकवले, डॉ. वि. ग. भिडे, डॉ. श्रीधर गुप्ते, डॉ. अरुण निगवेकर, डॉ. अशोक कोळस्कर, डॉ. वासदेव गाडे आणि विद्यमान म्हणून कुलगुरू डॉ. नितीन करमळकर हे पुणे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. पुढे त्यांची पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यावरून विद्यापीठातील प्राध्यापक संशोधन, गुणवत्तेत सरस असल्याचे स्पष्ट होत आहे.
प्राध्यापकांमुळे विद्यापीठाची प्रतिमा उंचावली
देशातील दहा विद्यापीठांत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा क्रमांक लागतो. पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन, अध्यापनाच्या गुणवत्तेवर मोहोर उमटविली आहे. त्यात सर्वाधिक वाटा येथील प्राध्यापकांचा आहे. सध्याही विद्यापीठातील अनेक विभागातील प्राध्यापक अन्य विद्यापीठांच्या कुलगुरू निवडीत आघाडीवर असतात. त्यामुळे या प्राध्यापकांमुळे विद्यापीठाची प्रतिमा उंचावली आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.