पुणे -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापकांच्या सुमारे 55 टक्क्यांहून अधिक जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे. विद्यापीठातील विविध विभागांसाठी मंजूर असलेल्या 386 पैकी केवळ 176 पदे भरण्यात आली आहेत. त्यामुळे देशात आघाडीवर असलेल्या पुणे विद्यापीठाला गुणवत्तेचा दर्जा टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
राज्य शासनाकडून प्राध्यापक भरतीला बंदी असल्याने विद्यापीठाच्या विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे पुणे विद्यापीठाला प्राध्यापकांवरील ताण कमी करण्यासाठी आणि विद्यापीठातील विभाग सुरू राहण्यासाठी त्यांच्या निधीतून काही प्राध्यापकांची नेमणूक करावी लागत आहे. त्यांच्या वेतनासाठी दरवर्षी सुमारे साडेतीन कोटी रुपयांहून अधिकचा खर्च विद्यापीठाला करावा लागत आहे.
विद्यापीठाने 100 प्राध्यापकांची कंत्राटी आणि विद्यापीठाच्या निधीच्या आधारे नेमणूक केली आहे. या नेमणुकीवरील होणाऱ्या खर्चाचा भार विद्यापीठाच्या तिजोरीवर पडत आहे. विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि सहायक ग्रंथपाल अशी एकूण 42 पदे मंजूर करण्यात आली आहेत. परंतु, यापैकी केवळ 20 जागा भरण्यात आल्या आहेत.
राज्यातील विद्यापीठ, प्राध्यापकांच्या संघटनांनी आणि शिक्षण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनी प्राध्यापक भरती सुरू करावी, अशी मागणी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे वारंवार केली आहे. मात्र राज्य शासनाकडून केवळ आश्वासन होत असून, त्यावर कार्यवाही होताना दिसत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर प्राध्यापक भरतीची प्रक्रिया सुरू करावी, असा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे.
– राजेश पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ