सर, मुंबई क्रिकेटला वाचवा…

एमसीएची गावसकर यांना विनवणी

मुंबई – लिटील मास्टर सुनील गावसकर यांना मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) प्रशिक्षक निवड समितीचे सुकाणू हाती घ्या व मुंबईच्या क्रिकेटला वाचवा, अशी विनंती केली आहे.

वासिम जाफर व चंद्रकांत पंडित यांची नियुक्‍ती करण्याची संधी संघटनेने दवडल्याने तसेच माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचे दुर्लक्षच मुंबईच्या देदीप्यमान क्रिकेटच्या परंपरेला घातक ठरल्याची चर्चा क्रिकेटवर्तुळात सुरू असून आता त्यासाठीच गावसकरांना विनवणी करण्यात आली आहे.

जाफर व पंडित यांचीदेखील संघटनेत कार्यरत होण्याची इच्छा होती. मात्र, संघटनेने याबाबत काहीच प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे प्रचंड टीका सुरू झाली होती. संघटनेवर वर्चस्व असलेल्या वेंगसरकरांनीही याबाबत अत्यंत दुर्लक्ष केले तसेच वेळकाढूपणा केल्याने संघटनेतील सदस्य नाराज होते. आगामी मोसमासाठी विविध गटांतील प्रशिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतरही रणजी संघाच्या प्रशिक्षकाची निवड अद्याप करण्यात आलेली नाही.

वेंगसरकर यांच्या धोरणांवर सध्या संघटनेत प्रचंड नाराजी पसरली आहे. अशा स्थितीत केवळ गावसकर हेच यातून मार्ग काढू शकतात, या विश्‍वासामुळेच त्यांना विचारणा करण्यात आली आहे, असे संघटनेतील सूत्रांनी सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.