पुणे – मागील 24 तासांत पुणे शहरात करोनाचे नवीन 257 बाधित सापडले आहेत. तर 284 बाधित करोनामुक्त झाले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत हा बाधित दर 4.42 टक्के इतका राहिला आहे. तर 5 हजार 958 जणांच्या तपासणी अहवालातून ही बाधित संख्या समोर आली.
दरम्यान, करोनामुळे 19 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून, त्यामध्ये शहर-8, तर शहराबाहेरील 11 जणांचा समावेश आहे.
शहरात मागील चार दिवसांपासून बाधित संख्या कमी-अधिक प्रमाणात वाढत असल्यामुळे तीन टक्क्यांवर असलेला बाधित दर साडेचार ते पावणेपाच टक्क्यांवर पोहोचला आहे.
बाधित दर पाच टक्क्यांच्या पुढे गेला, तर शहरात पुन्हा निर्बंध लावण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वीच दिले आहेत. गुरुवारी दिवसभरात 5 हजार 817 संशयितांची नमुने तपासणी करण्यात आली.
शहरातील सक्रिय बाधित संख्या 2 हजार 703 असून, त्यातील 437 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 669 रुग्णांना ऑक्सिजन लावण्यात आला.
शहरातील आतापर्यंतची एकूण बाधित संख्या 4 लाख 75 हजार 97 वर पोहोचली आहे. त्यातील 8 हजार 509 बाधितांचा मृत्यू झाला, तर 4 लाख 63 हजार 885 जण करोनामुक्त झाले आहेत. शहरातील करोनामुक्तीचा दर 97.85 टक्के इतका आहे.