शोभाताई रसिकलाल धारिवाल यांच्या जन्मदिनानिमित्त उपक्रम
पुणे – रसिकलाल माणिकचंद धारिवाल फाउंडेशनच्या उपाध्यक्ष शोभाताई रसिकलाल धारिवाल यांच्या जन्मदिनानिमित्त “पुलकछाया’ उपक्रमांतर्गत 20 हजार देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत रांजणगाव महागणपती फाउंडेशनचे नियोजित शाळा प्रांगण, परिसरातील 21 गावे, कासारी महाविद्यालयाची जागा, शिरूरसह दौंड, केडगाव पोस्ट ऑफिस, आंबेगाव तालुक्यातील लोणीधामणी येथे रस्त्याच्या दुतर्फा, शाळा प्रांगण, संत श्री सावतामाळी डोंगरमाथा असे मिळून 20 हजार देशी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी शोभाताई धारिवाल म्हणाल्या, “वृक्षलागवड हा माझा छंद आहे व तो मी लहानपणापासून जोपासलेला आहे. कोणासही वृक्ष लागवड करावयाची असल्यास व्यक्ती, संस्था, शासकीय कार्यालये, विविध सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांना मागणीप्रमाणे देशी वृक्ष देण्यात येतील.’ आरएमडी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षांच्या 75 व्या जन्मदिनी एक लाख वृक्षलागवड केल्याची आठवण यावेळी त्यांनी सांगितली.
याप्रसंगी पोस्ट ऑफिस पुणे विभागाच्या निर्देशिका सिमरन कौर यांनी “आरएमडी फाउंडेशनचे कार्य निश्चितच गौरवशाली आहे,’ असे सांगत पोस्टाच्या विविध कार्यालयांत वृक्ष उपलब्ध करून दिल्याबाबत आभार मानले व इतर पोस्टाच्या कार्यालयांतही वृक्ष उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली.
यावेळी मदनबाई माणिकचंद धारिवाल रुग्णालयात वृक्षारोपण करण्यात आले. येथे करोनाकाळात सेवा देणारे डॉक्टर, नर्सेस व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. लोणीधामणी गावात ढोल, लेझीम, टाळ-मृदुंगांच्या गजरात वृक्षदिंडी काढण्यात आली. गावातील उद्यानासाठी इंद्राणी बालन फाउंडेशनतर्फे एक कोटी रुपये देणगी देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
तसेच शोभाताई रसिकलाल धारिवाल या नावाने हे उद्यान साकारले जाईल, अशी माहिती इंद्राणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी दिली. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आरएमडी फाउंडेशन नेहमीच मदत करेल, अशी ग्वाही फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी आर. धारिवाल यांनी दिली. चिंच, आंबा, फणस इत्यादी वृक्षलागवडीद्वारे गावातील लोकांना रोजगार मिळेल व गावात समृद्घी येईल, अशी माहिती लोणी गावाचे नागरिक असलेले व सध्या राज्याचे गृहविभाग सहसचिव असलेले कैलास गायकवाड यांनी दिली.
वृक्षलागवड मोहिमेत महागणपती फाउंडेशनचे सागर पाचुंदकर पाटील, माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी लोणी धामणीचे सर्व पदाधिकारी, आरएमडी ज्युनिअर व सीनियर अकॅडमी कासारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र ढमढेरे व कर्मचारी, गावातील सरपंच, स्वाती पाचुंदकर, शिरूरचे पोलीस निरीक्षक खानापुरे, राजगणेश घुमारे, डाक विभागाचे अधिकारी, आंबेगाव तालुक्याचे गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, आरएमडी हॉस्पिटल व रीसर्च सेंटर नाशिक येथील सर्व ट्रस्टी, पोपटलाल ओस्तवाल, डॉ. अरविंद जैन, सागर उंद्रे पाटील आदी उपस्थित होते.