कोरेगाव – कोरेगाव तालुक्यातील एका व्यक्तीची फसवणूक केल्याप्रकरणी नीलेश सुरेश चव्हाण (रा. वडगाव हवेली, ता. कराड) याला दोन वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास, अशी शिक्षा कोरेगावच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती यू. ए. भोसले यांनी सोमवारी ठोठावली.
या प्रकरणातील तक्रारदाराकडे नीलेश चव्हाणने दि. 22 डिसेंबर 2022 काम मागितले. तक्रारदाराने त्याला काम देऊन, त्याची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था केली होती. तक्रारदार व इतर सर्व जण दिनांक 24 जून 2023 रोजी कामावर असताना, तक्रारदाराने नीलेश चव्हाण यास घरातून जेवणाचे डबे आणि तेलाचे कॅन घेऊन यायला सांगितले होते. त्यानुसार त्याने कामावर असलेल्या अक्षय बोडरे यांच्या दुचाकीवरून तक्रारदाराच्या घरी गेला. तेथून तेलाचे कॅन आणि तक्रारदाराचा मोबाइल घेऊन, तो कामावर न जाता, कराडकडे निघून गेला. बराच वेळ होऊनही नीलेश कामावर न आल्याने तक्रारदार आपल्या घरी गेला असता, पत्नीने झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर तक्रारदाराने चव्हाणच्या मोबाइलवर संपर्क साधला असता, तो बंद होता.
त्यानंतर अक्षय बोडरेची दुचाकी व आपला मोबाइल नीलेश चव्हाणने चोरून नेल्याची तक्रार कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी नीलेश चव्हाणकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली. मात्र, तक्रारदाराचा मोबाइल मिळाला नाही. याप्रकरणी पोलिसांनी कोरेगाव न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती भोसले यांच्यासमोर झाली. सरकार पक्षातर्फे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता शीतल कुलकर्णी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने नीलेश चव्हाणला दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात कोरेगाव पोलीस ठाण्याचे पैरवी अधिकारी विकास आव्हाड, सहाय्यक फौजदार यादव, एस. एस. देखणे, अॅड. विशाल शिरतोडे यांनी सहकार्य केले.