सातारा – येथील अजिंक्य कॉलनीत बुधवारी अचानक मिक्सर वाहनाचा हँडब्रेक सुटल्याने हे वाहन उताराने जाऊन हुंदाई वेरना कार आणि सात दुचाकींना धडकले. हे वाहन गुलमोहराच्या झाडाला धडकून थांबले. ते झाड मुळासकट उन्मळून कारवर पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही. निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी सचिन भोसले (रा. निकमवाडी, ता. वाई) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
याबाबतची माहिती अशी, काँक्रिट मिक्सरप्लँट असलेले वाहन बुधवारी दुपारी 12.30 च्या सुमारास अजिंक्य कॉलनीकडे उताराने जात होता. चौकातील हॅरिसन कॅफेसमोर चालक सचिन भोसलेने वाहन थांबवले आणि हँड ब्रेक लावून तो खाली उतरला. ब्रेक व्यवस्थित न लागल्याने मिक्सर वाहन उताराने वेगाने जाऊन, रस्त्याकडेच्या सात दुचाकी वाहनांना चेपत, गुलमोहराच्या झाडाला धडकले. गुलमोहराचे झाड मुळापासून उन्मळून हुंदाई कारवर कोसळून, गाडीच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला. या अपघातामुळे कॉलनीत गोंधळ उडाला. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. वाहनचालक मात्र घटनास्थळावरून पळून गेला. हुंदाई आणि अन्य दोन वाहनांच्या चालकांनी सचिन भोसले याच्या विरोधात तक्रार नोंदवली.