नितीन पाटील यांचे गौरवोद्गार; वाई शाखेचे स्वमालकीच्या इमारतीमध्ये स्थलांतर
वाठार स्टेशन – कोरेगाव तालुक्याच्या उत्तरेकडे अवर्षणग्रस्त ग्रामीण भागात शेतकरी व सर्वसामान्यांच्या विकासासाठी स्थापन झालेल्या छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेने केलेली प्रगती कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी काढले.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या वाई शाखेचे स्थलांतर स्वमालकीच्या सुसज्ज इमारतीमध्ये झाले. याप्रसंगी नितीन पाटील बोलत होते. यावेळी आमदार मकरंद पाटील, पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष शशिकांत पवार, किसनवीरचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सहकार हा पश्चिम महाराष्ट्राच्या नसानसात असून येथील जनतेला यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, किसनवीर आबा तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्यापासून सहकाराचे बाळकडू मिळाले आहे, असे नमूद करून श्री. पाटील म्हणाले, सहकाराची मातृसंस्था चांगली असेल तर तिच्या पंखाखाली असणाऱ्या संस्थादेखील चांगल्या चालतात.
नाबार्ड पुरस्कारप्राप्त जिल्हा मध्यवर्ती बँकेने सहकाराला दिशा देण्याचे काम केले आहे. संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी जिल्हा बँकेत केलेल्या कामाचा अनुभव या पतसंस्थेच्या वाटचालीत मोलाचा ठरला आहे. कै.लक्ष्मण तात्यांनी संस्थेला वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य केले आहे. राज्यातील अग्रगण्य पतसंस्थांमध्ये संस्थेचा नावलौकिक आहे. ५२ पैकी निम्म्याहून अधिक शाखा स्वमालकीच्या जागेत आहेत. २० वर्षांपूर्वी वाईत शाखा विस्तार करत या संस्थेने ठसा उमटवला असून संस्थेच्या अर्थसाह्याने अनेक कुटुंबे उभारी घेत आहेत.
संचालक सुरेशराव साळुंखे म्हणाले, संस्थेने ३५ वर्षे काटकसरीने कामकाज केले. अडचणीतील पतसंस्थांचे विलीनीकरण करत ठेवीदारांच्या कष्टांचे पैसे परत केले. त्यामुळे संस्थेवर सर्वसामान्यांचा विश्वास दुणावला. संचालक मंडळाच्या अभेद्य एकीमुळे संस्थेची दमदार वाटचाल सुरू आहे. त्याकरिता कै. लक्ष्मण तात्यांच्या पश्चात मकरंद आबा आणि नितीन काकांच्या मार्गदर्शनामुळे संस्थेची घोडदौड सुरू आहे.
संस्थापक व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रामभाऊ लेंभे यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, संचालक अशोकराव लेंभे, टी. एन. ढमाळ, हणमंतराव निकम, भरत साळुंखे, सचिन पोळ, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठल माने, दिलीप हगवणे, कार्यकारी संचालक भावेश ढमाळ, प्रमोद धुमाळ, अशोकराव पवार, मारुती भोसले, विलास जायकर, रमेश पोळ, शिवाजी निंबाळकर, सुरेश जाधव, शाम जायगुडे, भिमराव यादव, मदन भोसले, विश्वनाथ वायदंडे, शाखाप्रमुख विजय जुनघरे उपस्थित होते.