पुणे – शहरातील ढगाळ वातावरणामुळे गेल्या ४८ तासांत किमान तापमानात दोन ते तीन अंशाने वाढ झाली आहे. त्यामुळे शहरात थंडीचा जोर कमी झाला आहे. रविवारी (दि. ४) शहरातील किमान तापमान १४.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
महिन्याच्या पहिल्याच दिवशी शहरातील किमान तापमानात लक्षणीय घट झाल्यामुळे किमान तापमान ८ अंशापर्यंत खाली आले आणि हुडहुडी भरणारी थंडी जाणवू लागली. मात्र, बदलत्या हवामानामुळे २४ तासानंतर किमान तापमानात हळूहळू वाढ होऊ लागल्याने आणि ढगाळ वातावरणामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात ९ अंश सेल्सिअस असलेले किमान तापमान १४ अंशावर पोहचले. दरम्यान, पुढील दोन दिवस हवेतील आर्द्रतेमुळे किमान व कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही. आकाश निरभ्र तर अधूनमधून ढगाळ वातावरण राहील. सकाळी हलके धुके पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
गेल्या २४ तासात शहरासह जिल्ह्यातील प्रमुख भागातील किमान तापमान
माळीण 12.9, हवेली 13.1, एनडीए 13.2, शिरूर 13.2, शिवाजीनगर 14.1, पाषाण 14.9, दौंड 15, बारामती 15.7, राजगुरूनगर 16.1, इंदापूर 17.3, भोर 17.5, लोणावळा 19.4, खेड आणि मगरपट्टा 19.6, वडगाव शेरी 20.9