पाच अज्ञातांसह दहा जणांवर वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
कलेढोण – शाळकरी मुलीला त्रास देत असल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पालकाला जमावाने मारहाण करण्याची घटना येथील बस स्थानक परिसरात घडली. याबाबत पाच अज्ञातांसह दहा जणांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, यातील एका संशयितास भेटून मुलीच्या पालकाने त्याला जाब विचारला. आमच्या मुलींना तुझा पुतण्या त्रास देतो,त्याला समजावून सांगा, असे पालक म्हणताच संशयित चिडला आणि आमच्या पुतण्याची बदनामी का करतोस, म्हणून त्याला शिवीगाळ सुरु केली. त्याचवेळी आणखी पाच जण तिथे आले.
मुलाची बदनामी करतोस का असे म्हणत त्या मुलीच्या पालकाला शिविगाळ करत मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी आणखी अज्ञात पाच जण तेथे आले. त्यांनीही पालकास मारहाण केली. एकाने त्यांच्या डोक्यात बादली मारली व खाली पाडले त्यावेळी त्यांच्या गळ्यातील दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावून घेतली, असे तक्रारीत म्हटले आहे. या दहा जणांवर भारतीय दंड विधान कलम 327, 324, 143, 147, 148, 323, 504, 506 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
मुलींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह
कलेढोण येथे विद्यार्थिनी व परगावी जाणाऱ्या महाविद्यालयीन युवतींना रोडरोमिओंचा त्रास होत असल्याची तक्रार पालक करत आहेत. मुलींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून रोडरोमिओंकडून मुलगी शाळेतून घरी किंवा शाळेत जाणाऱ्या मुलींचा पाठलाग करून लिफ्टबद्दल विचारणा करणे, पाठलाग करणे असे अनुचित प्रकार घडत आहे. अशा घटनेकडे निर्भया पथक व पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.