सातारा – पाटण तालुक्यातील डाकवेवाडी येथील उमेश हरिष डाकवे या युवकाने दि. 11 नोव्हेंबर रोजी पोलीस मुख्यालय परिसरात विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या दिवशी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून कराड येथील पाच जणांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या घटनेने खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, किरण पाटील, लुकमान मुजावर, परिन शहा, दिलीप शहा, अनिल शहा (सर्व रा. कराड) या संशयितांनी व्याजाचे पैसे परत देण्यासाठी उमेश डाकवे याला वारंवार फोन करून मानिसक त्रास दिला. तसेच त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.
या त्रासाला कंटाळून पोलीस मुख्यालय परिसरात दि. 11 नोव्हेंबर रोजी त्याने विषारी औषध प्राशन केले होते. कराड येथील कृष्णा हॉसपिटलमध्ये 12 नोव्हेंबर रोजी रात्री पावणेदहा वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत वडील हरिष बाळकृष्ण डाकवे (वय 58) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक केणेकर तपास करीत आहेत.