वडूज – येथील एसटी बस आगारात श्री दत्तजयंती निमित्त प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरासही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी मूर्ती अभिषेक, जन्मोत्सव,पाळणा गीतं, ह. भ. प. विजय महाराज लोणीकर यांचं कीर्तन, पुष्पवृष्टी, महाप्रसाद आदी विविध कार्यक्रम भाविकांच्या मोठया उपस्थितीत पार पडले. तर आगार प्रमुख बिस्मिल्ला सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होते. या शिबिरात मराठा आरक्षण उपोषणकर्ते विजय शिंदे, युवा नेते मोहन देशमूख, अंकुश दबडे, ईश्वर जाधव संतोष पाटील यांच्यासह गोरेगाव निमसोडचे ग्रामस्थ व मराठा समाज बांधवांनी चक्क बसस्थानक ते एसटी डेपोपर्यंत एसटीमधून येत रक्तदान शिबिरात सक्रिय सहभाग घेतला.
स्वतः आगार प्रमुख सय्यद व कर्मचाऱ्यांनी ही यावेळी रक्तदान केलं. सुमारे 100 हुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.
देशात सर्वश्रेष्ठ दान हे रक्तदान असून देशसेवेत सहकार्य करणाऱ्या अशा शिबिरांचं विविध ठिकाणी आयोजन व्हावं, असं मत दत्त हॉस्पिटलचे संचालक डॉ. बी. जे. काटकर यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमास माजी सभापती संदीप मांडवे, माजी सरपंच बनसोडे, अक्षय ब्लड सेंटर सातारा आदींसह नागरिकांची मोठी उपस्थिती होती. दरम्यान एसटी आगाराने प्रथमच हा रक्तदान शिबिराचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आल्याने आगार प्रमुख व कर्मचाऱ्यांचं सर्वत्र अभिनंदन व्यक्त होत आहे.