पुसेगाव – राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद व यांची जयंती बुध येथील श्री नागनाथ विद्यामंदिरात उत्साहात साजरी करण्यात आली. सरपंच सौ. सुजाता बोराटे, उपसरपंच अभयसिंह राजेघाटगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, प्राचार्य अंकुश भांगरे, पर्यवेक्षक संजय कांबळे, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद, शिक्षमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. चंद्रकांत चव्हाण यांनी स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती दिली. अभयसिंह राजेघाटगे म्हणाले, आम्हीही शालेय जीवनात विवेकानंद सप्ताह उत्साहात साजरा करत होतो. मैदानी खेळांमध्ये सहभागी होत होतो. विद्यालयाच्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन, विद्यार्थ्यांनी आपली कौशल्ये सिद्ध करावीत.
प्राचार्य भांगरे, शिक्षक तानाजी पाटील, संजय कांबळे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. विद्यार्थी प्रणव खवळे, तन्वी म्हेत्रे यांनी मनोगत व्यक्त केले. सौ. भांगरे यांनी सौ. बोराटे यांचे, प्राचार्य अंकुश भांगरे यांनी राजेघाटगे यांचे, पर्यवेक्षक संजय कांबळे यांनी चंद्रकांत चव्हाण यांचे, तानाजी पाटील व दडस यांनी दत्तात्रय बोराटे यांचे स्वागत केले. भगवान सरवदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विलास नाळे यांनी आभार मानले. दरम्यान, स्वामी विवेकानंद व शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमांची मिरवणूक ढोल-ताशा, झांजपथकाच्या निनादात काढण्यात आली.