सातारा – जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या मागील बाजूस शुक्रवारी दुपारी तीन ठेकेदारांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन धराधरी झाल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
लाेकसभा निवडणुकीची आचारसंहिता महिनाभरात लागण्याची शक्यता असल्याने शासकीय कार्यालयात दिवसेंदिवस गर्दी वाढू लागली आहे. जिल्हा परिषदेच्या परिसरात वाहनांची मोठी गर्दी होत असून वाहने पार्क करुन घेताना सुरक्षारक्षकांची दमछाक होत आहे. जिल्हा परिषदेत व आवारात ठेकेदारांची हाणामारी जिल्हा परिषदेला नवीन नाही.
शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या मागील बाजूस तीन ठेकेदारांमध्ये अचानक जोरदार बाचाबाची सुरु झाली. अचानक जोरदार खडाजंगी सुरु झाल्याने बघ्यांची गर्दी झाली. या बाचाबाचीचे रुपांतर धराधरीत झाले. सुमारे अर्धा तास जोरदार खडाजंगी सुरु होती. परिसरात बघ्यांची गर्दी वाढल्यानंतर तिघांनीही तेथून काढता पाय घेतला.