रहिमतपूर – पद्मभूषण वसंतदादा पाटील प्राथमिक विद्यामंदिर आणि जिल्हा परिषद शाळा नं. १ च्यावतीने शनिवारी दि. २७ रोजी बाजार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थांना खरेदी विक्रीचे व्यवहार समजावेत, प्रत्यक्ष अनुभव मिळावा हा या बाजाराचा उद्देश होता. काकडी, भेंडी, केळी, बिस्कीट, गुलाबाची रोपे, पालेभाज्या, मंच्युरियन, घेवडा, बोरे हे सर्व या बाजारात बालचमूंनी विक्रीसाठी आणले होते. पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थांनी छोटे स्टॉल लावून विक्री आणि पैशाची देवाणघेवाण केली.
विद्यार्थांचा उत्साह वाढावा यासाठी पालकांनी स्टॉलवर येऊन खरेदी करत चिमुकल्यांचा चेहऱ्यावरचा आनंद टिपला. साधारणपणे दोनशेच्यावर स्टॉल या मैदानावर होते. या बाजारात अंदाजे पन्नास हजारांची उलाढाल झाल्याचे मुख्याध्यापक खांडे यांनी सांगितले. वसंतदादा संस्थेचे चेअरमन सुनील माने, सचिव एस. के. माने यांनी विद्यार्थांचे कौतुक केले