पिंपरी – राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी संप स्थगित केल्यानंतर पिंपरी-चिंचवड मधील अंगणवाडी सेविका देखील कामावर रूजू झाल्या. अंगणवाडी सेविकांनी अंगणवाड्यांमध्ये तिरंगा ध्वज फडकविला. ग्रॅज्युएटी लागू करणे आणि सेवानिवृत्ती वेतनाविषयीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्याचा निर्णय झाल्याने हा निर्णय घेण्यात आला.
गेल्या ५२ दिवसांपासून सुरु असलेला हा संप मागे घेण्यासाठी राज्य शासनाबरोबर अंगणवाडी कृती समितीच्या अनेक बैठका झाल्या. या बैठकांमध्ये शासन सेवानिवृत्ती वेतन आणि ग्रॅज्युएटी देण्याबाबत निर्णय होत नव्हता. त्यामुळे, अंगणवाडी कर्मचारी कृती समिती आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी चिवटपणे संप व विविध आंदोलने सुरू ठेवली होती.
सरतेशेवटी बैठकीत या दोन विषयांबरोबरच अंगणवाडी सेविकांना शासन तातडीने नवीन मोबाईल देईल. अंगणवाडी सेविका नियुक्तीसाठी बारावीची अट जुन्या म्हणजे आधी लागलेल्या मदतनीसांना लागू न करता त्यांना दहावी पास या आधीच्या शैक्षणिक अर्हतेवर सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात येईल, हाही निर्णय झाला आहे.
आशासेविका यांच्या मानधन वाढीच्या घोषणेमुळे आधी झालेल्या मानधनवाढीनंतर आठ महिन्यांतच पुन्हा एकदा अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना आंदोलन करावे लागले होते. त्या आशा सेविकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आला; तर त्याचवेळी अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव आपण ठेऊ, असे शासनाने मान्य केले होते. त्याबाबत पुनर्विचार प्रशासनाने बैठकीत घेतला. त्यामुळे संप स्थगित करण्यात आला आहे.
– नितीन पवार, प्रदेश उपाध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी सभा, महाराष्ट्र