भिडेवाडा स्मारकासाठी तीन आठवड्यांत भूसंपादन
महापालिकेने तयार केलेले भिडेवाड्याचे संकल्पचित्र
पुणे – महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केलेल्या भिडे वाड्याच्या राष्ट्रीय स्मारकासाठी भूसंपादन करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली. त्यानंतर आता पुढील तीन आठवड्यांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
याबाबतचे नियोजन मनपा प्रशासनाने पूर्ण केले असून, जागामालक आणि भाडेकरूंना 15 दिवसांची नोटीस दिली जाणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
या जागेबाबत निकाल लागल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने स्मारकाचे काम सुरू करण्याचे आदेश महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला दिले.
न्यायालयाच्या आदेशानुसार जागेचे सुधारित मूल्यांकन करण्याचे काम करण्यात येत आहे. यानंतर भूसंपादन नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दरम्यान, प्रशासनाने या स्मारकाचा आरखडा आणि संकल्पचित्र यापूर्वीच तयार केले आहे. वरिष्ठ पातळीवरच ते अंतिम केले जाणार आहे.