शिक्रापूर – शिक्रापूर (ता.शिरूर) येथे आज ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. परंतु, यादरम्यान अचानकपणे मतदान मशीन बंद पडले आणि मतदारांना तब्बल दीड तास उन्हात ताटकळत उभे राहावे लागले आहे. याचा जेष्ठांना मोठा त्रास सहन करावा लागला. यामुळे मतदान केंद्रावर गोंधळ उडाला आहे.
शिक्रापूर (ता.शिरूर) येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान प्रक्रिया पार पडत आहे. येथे सहा वार्ड असून मतदार संख्या जास्त असल्याने वार्ड क्रमांक एक व दोनचे मतदान शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशाला शाळेमध्ये तर तीन, पाच आणि सहाचे मतदान जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पार पडत आहे. वार्ड क्रमांक दोनचे मतदान शांततेत सुरु असतानाच मशीन दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक बंद पडल्याने मोठा गोंधळ उडाला. यामुळे, मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
दरम्यान, प्रशासनाने मशीन मधील तांत्रिक बिघाड दुरुस्त केल्यानंतर तब्बल दीड तासाने मतदान मशीन पूर्ववत सुरु झाले. मात्र तोपर्यंत अनेक वृद्ध मतदारांना ताटकळत उभे राहावे लागल्याने मोठा त्रास सहन करावा लागला. याबाबत मतदार तसेच उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली.
तर यावेळी बोलताना मशीनमधील एका बटणाचा प्रॉब्लेम आला होता. त्यामुळे मतदान मशीन दीड तास बंद राहिलेली असल्याने याबाबत वरिष्ठांना कळविलेले आहे. तसेच सदर दीड तास सायंकाळी वाढवून देण्यात येत असल्याने शिक्रापूर विभागाचे निवडणूक क्षेत्रीय अधिकारी उद्धव ढापसे यांनी सांगितले.