दिवसभर कामकाज ठप्प, वारसा हक्काच्या जागा भरण्याचा निर्णय
सातारा – सातारा नगरपालिकेच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे सातारा पालिकेचे कामकाज दुसऱ्या दिवशीही बंद राहिले. आंदोलकांनी पालिकेच्या जुन्या प्रवेशद्वाराचा मार्ग अडवल्याने पालिकेतील सर्व केबिन मंगळवारी दिवसभर कुलुपबंद राहिली. वसुली, दाखले वाटप, तसेच सफाई कामे सर्वच व्यवस्था ठप्प झाल्याने प्रशासनासह नागरिकांच्या अडचणी वाढल्या.
मात्र, सायंकाळी उशिरा पालिका कर्मचारी युनियनचे अध्यक्ष श्रीरंग घाडगे, मुख्याधिकारी शंकर गोरे, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, माजी उपनगराध्यक्ष ऍड. दत्ता बनकर यांच्यात सविस्तर चर्चा झाली. नगरपालिका संचालनालयाच्या सूचनेनुसार लाड- पागे समितीच्या सूचनेनुसार वारसा हक्काच्या 24 जागा तात्काळ भरणे, व माजगावकर माळ येथे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वसाहतीकरिता जागेची मोजणी करणे याचा अंतिम आराखडा येत्या शनिवारी निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कामगार संघटनेने संप उशिरा मागे घेतला.
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी काम बंद आंदोलन सुरूच ठेवले. पालिकेचे नवीन प्रवेशद्वार कुलूपबंद ठेवून जुन्या प्रवेशद्वारावर कर्मचाऱ्यांनी ठिय्या दिला. अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा मार्ग रोखला. पालिकेत कामासाठी आलेल्या नागरिकांना हात हालवत परत जावे लागले. काही भागातील पाणीटंचाईचे निरोप पाणी पुरवठा विभागाला न पोहोचल्याने टॅंकर वितरणाची गैरसोय झाली. कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी प्रशासनाला वेठीला धरल्याने पालिकेचे 22 विभाग कुलुपबंद राहून कोणतेही कामकाज होऊ शकले नाही.
अधिकारी व कर्मचाऱ्यांना आंदोलकांनी पालिका इमारतीच्या बाहेर पिटाळले. स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या अहवाल नोंदीची प्रक्रियासुध्दा लटकली. सातारा पालिका कामगार युनियन व प्रशासन यांच्यात दिवसभर कोणतीही चर्चा झाली नाही. दिवसभर कामकाज बंद राहिल्यामुळे पालिकेत दिवसभर शांतता होती. सातव्या वेतन आयोगाचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना फरकाचा लाभ देणे, करंजे येथील मंजूर दोन हेक्टर जागा चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांना घरांसाठी देणे, एक तारखेला नियमित पगार करणे, कर्मचाऱ्यांना गणवेश व एक हजार रुपये धुलाई भत्ता, 2000 ते 2005 या दरम्यान जी भरती झाली नाही त्यांची त्वरित भरती करणे, ठेका पद्धत बंद करून रोजंदारीवर कर्मचारी नेमणे आदी मागण्यांसाठी कालपासून कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. नगराध्यक्षांशी काल केवळ तोंडी चर्चा झाली. मात्र, ठोस कोणताही निर्णय झाला नाही.