काशीळमधून साडेतीन लाखांच्या देशी-विदेशी मद्याची चोरी
नागठाणे – काशीळ (ता. सातारा) येथे काशीळ-पाली रस्त्यावर असलेले सरकारमान्य देशी दारूचे दुकान व बिअर शॉपी फोडून चोरट्यांनी साडेतीन लाख रुपये किमतीच्या देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या आणि सीसीटीव्ही यंत्रणेतील डीव्हीआर मशीन चोरून नेले. ही घटना शनिवार रात्री ते सोमवार सकाळच्या दरम्यान घडली. याबाबत मुकेश गुरमुखदास उदासो (रा. साईबाबा बंगला, तुळजाईनगर, मलकापूर, कराड) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी उशिरा फिर्याद दिली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, काशीळ-पाली रस्त्यावर मुकेश उदासो यांचे सरकारमान्य देशी दारूचे दुकान आहे. त्यालगत बिअर शॉपी आहे. नेहमीप्रमाणे ही दोन्ही दुकाने शनिवारी (दि. 25) रोजी रात्री बंद करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिनानिमित्त (ड्राय डे असल्याने) दुकाने बंद होती. सोमवारी (दि. 27) सकाळी दोन्ही दुकाने उघडण्यासाठी कामगार आले असता, देशी दारूच्या दुकानाचे कुलूप तोडलेले व शटर उचकटलेले दिसले.
शेजारी असलेल्या बिअर शॉपीचेही शटर उचकटलेले दिसले. कामगारांनी दुकानांमध्ये जाऊन पाहिले असता, देशी दारूच्या 70 बाटल्या, अनेक कंपन्यांच्या बिअरच्या बाटल्या, सीसीटीव्ही यंत्रणेचे डीव्हीआर मशीन व रोख रक्कम मिळून साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे लक्षात आले.