कोळकी- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका पूर्ण ताकदीने लढव्यात, असे आवाहन माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना केले.
जिल्ह्यातील नगरपालिकांच्या आगामी निवडणुकांसंदर्भात आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा फलटण येथे शुक्रवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते.
तालुक्यातील विविध विषयांबरोबर फलटण शहरातील रस्ते, गटारे, आरोग्य, करोनाचा वाढता प्रादुर्भाव, त्यावरील उपाययोजना, मलठण येथील पोलीस चौकीची प्रलंबित मागणी, या विषयांवर मेळाव्यात चर्चा करण्यात आली. प्रशासनासोबत बैठक घेऊन प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका पक्षाकडून लढवाव्यात. त्यासाठी कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल, अशी ग्वाही आ. चव्हाण यांनी दिली. त्यांच्या दौऱ्यामुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. मेळाव्यास पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अमीर शेख, शहराध्यक्ष पंकज पवार, जिल्हा सरचिटणीस शंकरराव लोखंडे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ दैठणकर,
तालुकाध्यक्ष अतुल कांबळे, उपाध्यक्ष मोहित बार्शीकर, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे, युवकचे तालुकाध्यक्ष अजिंक्य कदम, शहराध्यक्ष प्रीतम जगदाळे, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष ताजुद्दीन बागवान, शहराध्यक्ष अल्ताफ पठाण, नितीन जाधव, बेंद्रे, सोपानराव जाधव, ठोंबरे उपस्थित होते. मराठी पत्रकार परिषदेच्या तालुका पदाधिकाऱ्यांचा सत्कार आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी-बेडके यांनी आ. चव्हाण यांचे स्वागत केले.