सातारा- टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाला पदक मिळवून देण्यासाठी तिरंदाज प्रवीण जाधवने शर्थीचे प्रयत्न केले आहेत. आगामी काळातील स्पर्धा व 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीसाठी प्रवीणला आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण व प्रशिक्षक मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करण्याचे आश्वासन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीत भारताचे प्रतिनिधित्व करणारा सरडे, ता. फलटण येथील युवा क्रीडापटू प्रवीण जाधव याचा सत्कार रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे आपल्या लक्ष्मीविलास पॅलेस या निवासस्थानी केला.
त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक निंबाळकर, विकास भुजबळ उपस्थित होते. रामराजे म्हणाले, जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून प्रवीण जाधवचा जिल्ह्याच्यावतीने जाहीर सत्कार करण्याचे नियोजन करणार आहे.
त्यातून फलटण तालुक्यातील व जिल्ह्यातील खेळाडूंना प्रेरणा मिळेल. फलटण तालुक्यातील मुलामुलींना हॉकी, कबड्डीसह इतर खेळांचे दर्जेदार प्रशिक्षण मिळण्यासाठी फलटण येथे केंद्र व उत्कृष्ट दर्जाचे प्रशिक्षक उपलब्ध करून देणार आहे.
गरीब कुटुंबातील प्रवीण जाधवने तिरंदाजीसारख्या खेळात प्रशिक्षण घेऊन टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. त्याचा तालुक्यातील जनतेला अभिमान आहे. संजीवराजे म्हणाले, प्रथमच ऑलिम्पिकमध्ये खेळत असल्याने प्रवीण जाधवला अपयश आले असले, तरी पुढील ऑलिम्पिकसाठी आंतरराष्टीय दर्जाचे प्रशिक्षण मिळाल्यास, तो पदक मिळवेल.