पुसेगाव – सातारा जिल्ह्यातील दुष्काळी खटाव तालुक्यातील बुध गावचा रहिवासी असलेला अभिषेक धनंजय सूर्यवंशी आज देशातील पुरुष फुटबॉल खेळाडूंसाठी प्रेरणास्थान बनला आहे. अभिषेक सुर्यवंशी याने मोहन बागान देशातील अग्रगण्य अशा फुटबॉल क्लबबरोबर खेळण्याचा करार करून फुटबॉल जगतात नवा इतिहास रचला असून तसे करणारा तो पहिलाच महाराष्ट्रीय खेळाडू ठरला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर जर्सी क्रमांक १६, मोहन बागान सुपर जायंटस् कोलकाता अशी ओळख असलेला २२ वर्षीय अभिषेक हा भारतीय पुरुष फुटबॉल संघाचा नवा चेहरा आहे. २०२१ मध्ये मालदीव येथे झालेल्या आशिया करंडक क्लब फुटबॉल स्पर्धेसाठी एटीके मोहन बागानच्या संघात निवड होणारा हा पहिलाच फुटबॉलपटू आहे. अभिषेक सध्या मोहन बागान सुपर जायंटस् कोलकाताच्या संघातर्फे मिडफिल्डर या पोझिशनला खेळतो. मोहन बागान या देशातील अग्रगण्य अशा फुटबॉल क्लबतर्फे खेळण्याच्या करारावर त्याने गेल्या वर्षी स्वाक्षरी केली आहे. हा करार तीन वर्षांसाठी असून त्या करारानुसार अभिषेकला प्रतिवर्ष वीस लाख रूपये मिळणार आहेत. आंतरराष्ट्रीय व्यावसायिक पुरुष फुटबॉलपटूच्या तुलनेत हे यश सामान्य असू शकेल मात्र आपल्या महाराष्ट्रातील फुटबॉलपटू च्या आजवरच्या इतिहासात बघितले तर मोहन बागान सारख्या व्यावसायिक क्लबशी करार होणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.
शाळेत असताना सुरुवातीला क्रिकेट खेळणाऱ्या अभिषेककडे आक्रमकता, स्टॅमिना, तंदुरुस्ती हे बघून प्रशिक्षक नंदू अंगिरवार यांनी अभिषेकला फुटबॉलकडे वळण्याचा सल्ला दिला. त्यांनी अभिषेककडे असणाऱ्या नैसर्गिक गुणवत्तेचा वापर करून त्यास फुटबॉलमधील कौशल्याची जोड दिली व फुटबॉलमध्ये गोडी निर्माण केली. तो दहा वर्षांचा असताना त्याला प्रथमच १२ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली होती. तेव्हापासून आजपर्यंत त्याचा फुटबॉलमधील कामगिरीचा आलेख चढताच राहिला आहे. २०१६ मध्ये सतराव्या वर्षी पुणे जिल्हा फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित स्पर्धेत तो पुण्याचा कॅप्टन होता.
नंतर २०१७ मध्ये तो महाराष्ट्राचा कॅप्टन झाला. अठरा वर्षांखालील गटात त्याने डीएसके शिवाजीयन्स इंडियन लीगमध्ये प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर अठराव्या वर्षी तो रिलायन्स फाऊंडेशन युथ स्पोर्टसतर्फे फुटबॉल खेळला. कल्याणी भारत फुटबॉल क्लबचे कोच बॅरी नॉवेल, सचिन बधाडे व योगेश पिल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने फुटबॉलचे धडे गिरवले आहेत. त्याच्यातील कौशल्य ओळखून दिल्ली प्राईड स्पोर्ट्स संघात त्याला स्थान मिळाले. या संघातर्फे त्याला इंडियन लीग स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर पुढील वर्षी पुण्यातील डीएसके क्लब संघात त्याला स्थान मिळाले. तेथून तो २०१७ व २०१८ मध्ये इंडियन फुटबॉल लीग स्पर्धेत सहभागी झाला. अभिषेकने राष्ट्रीय स्तरावरच महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषवले आहे. फुटबॉल खेळाडू म्हणून राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकत असताना व्यावसायिक फुटबॉल खेळण्याचे स्वप्न तो पाहत असे. एटीके कोलकत्ताच्या कनिष्ठ संघाचा देखील तो कर्णधार होता. पुण्यातील भारत व डीएसके या फुटबॉल क्लबतर्फे खेळण्याची संधी त्याला मिळाली आहे.
घरातून मिळालेले प्रोत्साहन मोलाचे
फुटबॉलसाठी लागणारे प्रशिक्षण तसेच तंदुरूस्तीसाठी लागणारा आहार हे अत्यंत खर्चिक आहे. यासाठी त्याचे वडील धनंजय सूर्यवंशी यांनी अभिषेकला कोणतीही कमतरता भासू दिली नाही. त्याची आई अलका सूर्यवंशी यांनी त्याच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले. मोठा भाऊ अतुल हा स्वतःच राष्ट्रीय फुटबॉलपटू असल्यामुळे अभिषेकला त्याचे पुर्ण प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाले.