पोलीस प्रशासनाकडून चक्क अरेरावी
शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरुर) ऐतिहासिक विजयस्तंभ येथे होणारा शौर्यदिन शांततेत पार पडण्यासाठी प्रशासन वेगवेगळे उपाय राबवत असताना शिक्रापूर व लोणीकंद येथे अनुयायांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था केली जात होती,. शिक्रापूर येथे प्रथमच जित हॉटेल समोर पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली होती. पोलीस प्रशानाकडून स्थानिक नागरिक वेठीस धरत नागरिकांना अरेरावी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचाराच्यानंतर प्रशासन विशेष खबरदारी घेत असून नागरिकांना सर्व सुविधा पुरवण्यात येत असतात. काही वर्षापासून येथे येणाऱ्या समाज बांधवांची वाहने शिक्रापूर व कोरेगाव येथे पार्किंग करुन समाज बांधवांना कोरेगाव भीमा येथे शासकीय बसने नेले जाते.
या वर्षी प्रथमच मुख्य गावापासून टेक ते दीड किलोमीटर अंतरावर नगर रोड लगत असलेल्या मुलाणी मस्जिद ट्रस्टच्या जागेमध्ये पार्किंग व्यवस्था केली. याठिकाणी पुणे नगर रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला असताना येथे कंपनीतून, गावातून किंवा रस्त्याने घरी जाणाऱ्या नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाल्याचे दिसून आले.
यावेळी नागरिकांनी पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत सांगितले असता पोलीस अधिकारी देखील अरेरावी करीत वाहने लावून पायी जा, परत मागे जाऊन शेजारील गावातून जा आम्हाला काही सांगू नका, असे उत्तर देत होते. त्यामुळे शिक्रापूर येथे नव्याने केलेली पार्किंग ग्रामस्थांना डोकेदुखी ठरली आहे. पोलीस प्रशासनाने यामध्ये सुधारणा करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.