पुणे – राज्य क्रीडा दिन, राष्ट्रीय क्रीडा दिन व क्रीडा सप्ताह आयोजनासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्य क्रीडा दिनासाठी ७५ ह्जार रुपये, राष्ट्रीय क्रीडा दिनासाठी ५० ह्जार रुपये, क्रीडा सप्ताहासाठी १ लाख रुपये या प्रमाणे प्रति जिल्हा २ लाख २५ ह्जार रुपये अनुदान मिळणार आहे.
१५ जानेवारी हा ऑलिंपिकवीर दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे. शासन निर्णयान्वये राज्य क्रीडा दिनाच्या दिवशी राबविण्यात येणाऱ्या विविध क्रीडाविषयक उपक्रमांबाबतही सूचना दिलेल्या आहेत. सद्यस्थितीत राज्यात राष्ट्रीय क्रीडा दिन व क्रीडा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रीय क्रीडा दिन व क्रीडा सप्ताह साजरा करण्यासाठी शासन निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यास एकूण १० ह्जार रुपये अनुदान देण्यात येत आहे.
सद्यस्थितीस अनुसरून या अनुदानात वाढ करणे क्रमप्राप्त आहे. राज्य क्रीडा दिनाचा निर्णय झाल्याने क्रीडा सप्ताह, राष्ट्रीय क्रीडा दिन या उद्दीष्टांसोबतच राज्य क्रीडा दिनाचाही समावेश करणे आवश्यक आहे. या वस्तुस्थितीस अनुसरून क्रीडा सप्ताह व राष्ट्रीय क्रीडा दिन याकरिताच्या विद्यमान अनुदानात वाढ करणे तसेच त्यासोबत राज्य क्रीडा दिनाचाही समावेश करून त्याकरिता प्रतिजिल्हा अनुदान निश्चित करणे यासंदर्भातील प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन होता. त्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.
संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांना मंजुरीचे अधिकार प्रदान करण्यात येत असून त्यासाठी त्यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून आणि आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.