सातारा – येथील प्रमोद मनोहर कोपर्डे प्रतिष्ठानच्या वतीने सन २०२३ चे जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाले असून पुणे येथील ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, कादंबरीकार मकरंद साठे व नाशिक येथील ज्येष्ठ चित्रकार, कवी, लेखक धनंजय गोवर्धने यांची निवड करण्यात आली आहे.
साहित्य,कला, संस्कृती आणि समाज परिवर्तन या क्षेत्रात आयुष्यभर योगदान देणा-या दोन व्यक्तिंना एक वर्षाआड जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतात. यावर्षीच्या संस्कृती क्षेत्राचा सात-तारा जीवन गौरव पुरस्काराने मकरंद साठे यांना तर कला क्षेत्राचा कृष्णामाई जीवन गौरव पुरस्काराने धनंजय गोवर्धने यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
जीवन गौरव पुरस्कारांचे हे चौथे तर एकूण पुरस्कारांचे आठवे वर्ष आहे. पुरस्काराचे स्वरुप पस्तीस हजार रुपयांचा धनादेश, मानचिन्ह ,शाल पुष्पगुच्छ व सातारा कंदी पेढे असे आहे.या वर्षापासून जीवन गौरव पुरस्काराची रक्कम पंचवीस हजार रुपयां वरुन प्रत्येकी पस्तीस हजार रुपये करण्यात आली आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी, लेखक प्रमोद मनोहर कोपर्डे यांनी दिली.
प्रमोद मनोहर कोपर्डे आणि डॉ.गजानन अपिने यांच्या अंतिम निवड समितीने हे पुरस्कार निवडले आहेत. डॉ.विजय चोरमारे, डॉ. गजानन अपिने, कवी वसंत शिंदे, ज्योत्स्ना पाटील-शिंदे विश्वस्त असलेल्या या प्रतिष्ठानचा यावेळचा पुरस्कार वितरण समारंभ राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मृतीदिनी ३० जानेवारी रोजी मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता नगर वाचनालयच्या पाठक हाॅलमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज चे राज्यशास्त्र विभाग प्रमुख राजकीय, सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक, भाष्यकार डॉ.शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तसेच यावेळी त्यांचे “आपली राज्यघटना आणि बहुसांस्कृतिकता ” या विषयावर व्याख्यान होणार आहे, अशी माहिती प्रमोद मनोहर कोपर्डे यांनी दिली.