-->

सातारा: आमदारांच्या पाठिंब्यावर वाई तालुक्‍यात कार्यकर्त्यांची बाजी

भाजप, शिवसेना, कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या आघाडीची एकाकी झुंज; नेत्याविना पिछाडीवर

वाई  – वाई तालुक्‍यात ग्रामपंचायत निवडणुकीत जवळपास 90 टक्के ग्रामपंचायतींमध्ये आ. मकरंद पाटील यांचा करिष्मा दिसला. गावोगावच्या कार्यकर्त्यांना आ. पाटील यांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याने त्यांनी बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये बाजी मारली. भाजप, शिवसेना व कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी गावोगावी आघाड्या करून आमदारांच्या कार्यकर्त्यांना निकराची झुंज दिली; परंतु तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना खंबीर नेत्याविना पिछाडीवर रहावे लागले.

तालुक्‍यातील 76 पैकी 19 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 57 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. काही गावांमध्ये दोन-तीन जागांसाठी अटीतटीच्या लढती झाल्या. बावधन, पसरणी, लोहारे, खानापूर, परखंदी, धावडी, केंजळ, गुळुंब, सुरूर, धोम,मोहडेकरवाडी, उडतारे, ओझर्डे, देगाव, कडेगाव, विरमाडे, व्याजवाडी, शिरगाव, मेणवली, वरखरवाडी, पांडेवाडी, रेणावळे, चिखली, बेलमाची या राजकीयदृष्ट्या संवेदनशील गावांमध्ये गटातटांचे राजकारण, सत्ताधाऱ्यांची मनमानी, भावकी व गावकीची ईर्षा पेटल्याने दुरंगी वा तिरंगी लढती झाल्या. तालुक्‍याच्या राजकीय सारीपाटावर महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बावधनमधील निवडणूक जिल्ह्यात गाजली.

गावातील व तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना नेत्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारी ठरली. पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसचे व सद्य स्थितीत भाजपचे नेते व पंचायत समिती सदस्य दीपक ननावरे, शिवसेनेचे विवेक भोसले, मराठा महासंघाचे विक्रम वाघ यांनी तरुण व ज्येष्ठांच्या मदतीने सत्ताधीशांना घाम फोडला. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सभापती, उपसभापतिपद भोगलेल्या नेत्यांना निसटत्या विजयावर समाधान मानावे लागले. किसनवीर कारखान्याचे संचालक सी. व्ही. काळे, अविनाश फरांदे आदींनी ओझर्डेत घड्याळाचे काटे उलटे फिरवून कमळ फुलवले. ओझर्डे गट व गणातील राजकीय समीकरणे आगामी काळात बदलण्याचे संकेत आहेत.

केंजळ व गुळुंब येथे पंचायत समितीचे माजी उपसभापती व राष्ट्रवादीचे महादेव मसकर, अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली सत्तांतर घडवून आणले. गणातील सुरूर, चांदक, मोहडेकरवाडी, वहागाव, आनंदपूर या गावांमध्ये राष्ट्रवादीच्या विचारांची सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवून आ. पाटलांच्या नेतृत्वावरील विश्वास सार्थकी लावला. विधानसभा निवडणुकीत खा. उदयनराजेंच्या गटात सामील झालेले पंचायत समितीचे माजी सभापती विजयसिंह नायकवडी यांनी धोममध्ये सत्तांतर घडवून आणले. तरुण व ज्येष्ठांची मोट बांधून घड्याळाचे काटे बंद पाडण्यात नायकवडी यांनी मिळवलेले यश पाहता, पश्‍चिम भागातील आगामी निवडणुकांमध्ये याची दखल आ. पाटील यांना घ्यावी लागेल.

पांडेवाडी या छोट्या, पण राजकीयदृष्ट्या जागरूक गावात युवा कार्यकर्त्यांनी एकत्र येत, पंचायत समितीचे माजी उपसभापती व आमदारांचे निकटवर्तीय शंकर शिंदे यांना धोबीपछाड दिली. गेल्या तीन दशकांच्या सत्तेतून पायउतार करून मेणवली भागात त्यांच्या नेतृत्वाला शह दिल्याचे बोलले जाते. व्याजवाडीत भाजपचा एक गट आ. पाटलांच्या वळचणीला गेल्याने बाजार समिती सभापती लक्ष्मण पिसाळ व अन्य नेत्यांनी सत्तांतर घडवले. पसरणी, उडतारे, विरमाडे येथे कार्यकर्त्यांमध्ये गटबाजी झाली, तरी सत्ता आमदारांच्या विचारांची राहिली. लोहारे, मेणवली, शेंदुजणे, खानापूर, परखंदी, धावडी, कडेगाव, देगाव, सटालेवाडी येथील सत्ताधीशांना विरोधकांनी सळो की पळो करून सोडले होते.

निकाल लागेपर्यंत नेत्यांची धाकधूक वाढली होती. रेणावळे, चिखलीत निवडणूक लादलेल्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करून लोकांनी त्यांची जागा दाखवून दिली. तळागाळात न राहता, मुंबई, दिल्लीत घिरट्या घालणारे, तालुक्‍यात विराजमान होण्याची स्वप्ने पाहणारे कॉंग्रेसचे विमान, परखंदी या एकाच गावात जमिनीवर उतरवण्यात यश आल्याने कार्यकर्त्यांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तालुक्‍यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये आमदार गटाने बाजी मारली असली तरी बावधन, ओझर्डे, धोम व अन्य काही गावांमधील निकाल आ. मकरंद पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारे आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.