सातारा: कास धरण उंची वाढवण्याचे काम 15 मेपर्यंत पूर्ण करा

आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या अधिकाऱ्यांना सूचना; कामाचा घेतला आढावा

सातारा – कास धरण उंची वाढवण्याच्या कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यामुळे 57.91 कोटी रुपयांचा वाढीव निधी उपलब्ध झाला आहे. हा प्रकल्प तातडीने पूर्ण झाला पाहिजे. उर्वरित काम येत्या 15 मेपर्यंत पूर्ण करा, अशी सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.

कास धरणाच्या उंची वाढवण्याच्या प्रकल्पाला आ. शिवेंद्रराजेंच्या मागणीवरून ना. अजित पवारांनी मंजुरी दिली होती. त्याच पवारांनी काही दिवसांपूर्वी आ. शिवेंद्रराजे यांच्याच मागणीवरुन प्रकल्पासाठी 57.91 कोटींचा वाढीव निधी मंजूर केला. या प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण होऊन सातारकरांचा पाणीप्रश्न कायमचा सुटावा यासाठी सतत पाठपुरावा करणाऱ्या आ. शिवेंद्रराजे यांनी बुधवारी कृष्णानगर येथे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ, पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले उपस्थित होते. या बैठकीत आ. शिवेंद्रराजे यांनी प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. सातारा शहर आणि कास मार्गावरील 15 गावांसाठी हा प्रकल्प पूर्ण होणे अत्यावश्‍यक आहे. शासकीय सोपस्कार पूर्ण करून, राहिलेली कामे दर्जेदार व वेळेत करा, अशी सूचना आ. शिवेंद्रराजे यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.