-->

सातबारा उताऱ्यापाठोपाठ प्रॉपर्टी कार्डही मिळणार ऑनलाइन

जिल्ह्यातील दोन लाख प्रॉपर्टी कार्ड झाली उपलब्ध; पारदर्शकता येणार

पुणे – सातबारा उताऱ्यापाठोपाठ आता प्रॉपर्टी कार्डसुद्धा ऑनलाइनच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह गावठाण मिळून एकूण 2 लाख 32 हजार प्रॉपर्टी कार्ड आहेत. यातील सुमारे 2 लाख प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या प्रॉपर्टी कार्ड पाहता येणार आहे. या प्रॉपर्टी कार्डवर डिजिटल सिग्नेचर असणार आहे. त्यामुळे हे कार्ड सर्व शासकीय कामांसाठी ग्राह्य धरले जाणार आहे.

भूमी अभिलेख विभागाने विविध प्रकारच्या सेवा देण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर सुरू केला आहे. केंद्र सरकारने “ईज ऑफ डुईंग बिझनेस’चे धोरण अवलंबिले आहे. त्याअंतर्गत अभिलेखांचे संगणकीकरण, फेरफार प्रक्रियेत सुटसुटीतपणा आणि किमान मानवी हस्तक्षेप या तत्त्वांचा स्वीकार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत ऑनलाइन प्रॉपर्टी कार्ड देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. या ऑनलाइनमुळे कामकाजात गतिमानता आणि पारदर्शकता येणार आहे.

www.digitalsatabara.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. प्रॉपर्टी कार्डसाठी ऑनलाइन पद्धतीने पैसे भरण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैशांची बचत होणार आहेत. नागरिकांकडून या सुविधेचे स्वागत करण्यात येत आहे.

हे होणार फायदे
– घरबसल्या प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन मिळणार
– नागरिकांना भूमापन कार्यालयात जाण्याची गरज नाही
– वेळेची बचत
– प्रॉपर्टी कार्डसाठी ऑनलाइन पैसे भरण्याची सुविधा
– बनावट प्रॉपर्टी कार्डला आळा बसणार, फसवणूक टळणार

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.