विजय सपकाळ
मेढा – नाचणीचे गाव म्हणून ओळखले जाणाऱ्या तीर्थक्षेत्र कुसुंबी (ता. जावळी) येथील नाचणीपासून बनवलेले दिवाळी पदार्थ अमेरिकेत पोहचले आहेत. दर्जेदार उत्पादन असल्याने अमेरिकास्थित महाराष्ट्रीय लोकांनी शुद्ध नाचणीपासुन बनविलेल्या दिवाळी पदार्थांची मोठी ऑर्डर दिली. युद्धपातळीवर रात्रंदिवस काम करून या उत्पादक महिलांनी पहिला टप्प्यातील उत्पादन पाठवून दिले.
नाचणीपासून सुप, लहान मुलांना खिमटी, पापड, लाडू असे विविध पदार्थ बनवले जातात. ते शरीराला पोषक असतात. त्याला मागणीही मोठी असते. कुसुंबी गाव जावळी तालुक्यात दक्षिणेस डोंगराच्या पायथ्याला कास पठाराच्या डोंगर पायथ्याशी वसले आहे. बारा वाड्या वस्त्या असलेल्या या गावाची ग्रुप ग्रामपंचायत आहे. या गावाचे प्रमुख पीक नाचणी. डोंगरावर बेसाल्टचा खडक आणि त्यातून वाहून येणाऱ्या पाण्यात खनिजांचे पोषक घटक मॅंग्नेशियम, कॅंल्शियम, झिंक इत्यादी पिकांना दर्जेदार बनवतात.
त्यातच पीक घेण्याची पद्धत पारंपरिक आहे. गुरे, शेळ्या, मेंढ्यांच्या मलमूत्रामुळे मातीचा पोत चांगला आहे. रासायनिक खतांचा वापर टाळला जातो. शेती उतारावर असल्याने पाणी निचरा उत्तम प्रकारे होतो. यामुळे नाचणी पिकाचे उच्च प्रतीने पोषण होते. येथील नाचणीचे सरासरी वार्षिक उत्पादन 85 टन घेतले जात होते. बाजारपेठेत मागणी वाढल्याने नाचणीच्या लागवडीच्या प्रमाणात यावर्षी दुप्पट वाढ झाली. या गावाला अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेने दत्तक घेतले आहे. त्या सोबत साताऱ्यातील अवार्ड संस्था, मुंबईची आरएससीडी संस्थेचे सहकार्य मिळत आहे.
कुसुंबीतील उत्पादनांना बाजारपेठ मिळवणे, पर्यटनात नावलौकिक मिळवणे, काळेश्वरी देवस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा मिळणे, तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध करून देणे अशी धोरणे आहेत.
मारुती चिकणे,सरपंच, ग्रूप ग्रामपंचायत, कुसुंबी
नाचणीच्या पदार्थांना प्रचंड मागणी
या संस्थांनी महिला सक्षमीकरण, आरोग्य, शैक्षणिक सुधारणा, सेंद्रिय परसबाग, सोलर एनर्जी स्कूल, बचत गट निर्मिती, नाचणी प्रक्रिया ऊद्योग, प्रशिक्षण शिबिरे, नाचणीच्या पदार्थांची रेसिपी सराव असे उपक्रम घेतले. आहारात पोषक म्हणून नाचणी सुप्रसिद्ध झाल्याने पदार्थांना मागणी वाढली. वरील संस्थांच्या तांत्रिक सहकार्याने कुसुंबी नाचणीचे गाव घोषित करण्यात आले. पदार्थ निर्मितीसाठी गुजरात, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. अवॉर्ड संस्थेच्या संचालिका सौ. संगीता वेंदे यांनी महिलांना प्रोत्साहित केले. महिला फूड प्रोसेसिंग कंपनी स्थापन केली. नाचणीचे पौष्टिक लाडू, शेवया, चिवडा, भडंग, कुकीज, मिठाई, केक मागणीप्रमाणे बनवून दिले जात आहेत.