शनिवारी होणार एक्सपो धावपटूंसाठी बसची विशेष व्यवस्था
सातारा – आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमुख मॅरेथॉनपैकी एक गणल्या जाणाऱ्या सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. शनिवारी, 24 ऑगस्ट रोजी शेंद्रे येथे एक्सपो होईल. रविवार, 25 रोजी होणाऱ्या मॅरेथॉनचा प्रारंभ पोलीस कवायत मैदानावर मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. रेस डायरेक्टर डॉ. देवदत्त देव व सातारा रनर्स फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रतापराव गोळे यांनी याबाबतची माहिती दिली.
डॉ. गोळे म्हणाले, “सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या आदल्यादिवशी, शनिवार 24 रोजी सकाळी साडेआठ ते सायंकाळी 6 या दरम्यान एक्सपो होणार आहे. हा एक्सपो शेंद्रे येथे अजिंक्यतारा कारखाना कार्यस्थळावर, कै. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवनात होईल. त्याचे उद्घाटन सकाळी 10 वाजता आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते होईल. यावेळी अजिंक्यतारा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई व सैनिक स्कूलच्या प्राचार्या कॅप्टन श्रीमती मनीषा मिश्रा प्रमुख उपस्थित राहणार आहेत.’
उपाध्यक्ष डॉ. सुचित्रा काटे म्हणाले, “धावपटूंना रेस किट देण्यात येईल. त्यात टी शर्ट, बीब क्रमांक, संगणकीकृत टाईमिंग चिप इत्यादींचा समावेश आहे. परंतु त्यासाठी स्पर्धकांनी पैसे भरल्याची मूळ पावती अथवा स्वतःच्या मोबाईलवर आलेला मेसेज दाखवणे आवश्यक आहे. स्वतःचा फोटो असलेले अधिकृत ओळखपत्र सोबत ठेवावे. स्पर्धकांनी आपले बिब स्पर्धेच्या आदल्या दिवशी एक्सपोमधून घेऊन जावेत. कार्यालय सायंकाळी 6 नंतर हस्तांतरित करुन द्यायचे असल्याने त्यानंतर कोणालाही बिब, रेसकिट देणे शक्य होणार नाही. बाहेरगावच्या स्पर्धकांना सकाळी साडेआठ ते सायंकाळी 6 या वेळेत बिब देण्यात येतील. सातारकर स्पर्धकांनी मात्र सकाळी साडेआठ ते दुपारी 3.00 या वेळेतच बिब न्यावेत.’
मुख्य स्पर्धेचा प्रारंभ रविवारी, 25 रोजी सकाळी 6 वाजता पोलिस कवायत मैदानावरुन होईल. पालकमंत्री विजय शिवतारे, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल व पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची प्रमुख उपस्थित असणार आहे. धावपटू पोलिस मैदानावरुन पोवई नाकामार्गे कर्मवीर पथावरुन (खालचा रस्ता) पोलीस मुख्यालय, शेटे चौक मार्गे कमानी हौद, मोती चौक, गोल बाग, यादोगोपाळ पेठ, समर्थ मंदिर, बोगदा, यवतेश्वर घाटातून प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टच्यापुढे 200 मीटर जाईल.
परत त्याच मार्गे यवतेश्वर घाटातून समर्थ मंदिर, अदालत वाडा, केसरकर पेठ, सातारा नगरपरिषद, बगाडे हॉस्पिटल, रविवार पेठ पोलीस वाहतूक शाखेपासूनखाली वळून खालच्या रस्त्याने, पोवई नाका, पोलीस कवायत मैदान येथे स्पर्धा पूर्ण होईल. सर्व स्पर्धकांनी पोलीस कवायत मैदानावर सकाळी सव्वापाच वाजेपर्यंत हजर राहावे, असे आवाहन सचिव जितेंद्र भोसले व अभिषेक भंडारी यांनी केले. सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या निमित्ताने आपल्या साताऱ्याचा नावलौकिक जगभर व्हावा, यासाठी स्पर्धेवेळी सातारकरांनी धावपटूंना प्रोत्साहन द्यावे. तसेच त्यांना गरजेनुसार मदत करावी, असे आवाहन राहुल घैताडे, भाग्यश्री ढाणे व विशाल ढाणे यांनी केले.